२० ऑगस्ट २०१३, सकाळी साधारण ७.३० वाजताची वेळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे नास्तिकतावादी नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले आणि दुसरीकडे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तीमत्त्व ! अंधश्रद्धा निर्मूलन करतांना अकारण डॉ. दाभोलकर यांनी थेट देवालाच हात घातला आणि सश्रद्ध समाजाकडून त्यांचा स्वाभाविक विरोध चालू झाला. महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांचा जसा पुरोगामी वारसा आहे, तसा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक अशा अगणित श्रद्धावान, ईश्वरनिष्ठ संत-महापुरुषांचीही पुष्कळ मोठी परंपरा आहे, हे अजिबात विसरता येणार नाही. आजही भगवंतावर उत्कट श्रद्धा असलेली बरीच उच्चशिक्षित मंडळी समाजाच्या या बहुतांश घटकात मोडतात. अशा वातावरणात ‘देवाला विरोध’ अनपेक्षित होता ! असो, याचा अर्थ त्यांची हत्या ही कधीच समर्थनीय असू शकत नाही; मात्र त्यांची हत्या आणि त्यानंतरचा आजपर्यंतचा घटनाक्रम पहाता अनेक गोष्टींवर परखडपणे विवेकबुद्धीने चिकित्सा करण्याची आवश्यकता आहे की, जी वस्तूनिष्ठपणे करतांना दुर्दैवाने आज कुणी दिसत नाही किंवा केलीच तर त्याला थेट ‘अविवेकी’ ठरवले जाते.
१. पुरोगाम्यांच्या हत्या आणि संशयास्पद अन्वेषण !
१ अ. २० ऑगस्ट २०१३ : ‘मॉर्निंग वॉक’ला (सकाळी फिरायला) गेलेल्या डॉ. दाभोलकर यांची बालगंधर्व पुलावर हत्या झाली आणि प्राथमिक स्तरावर दाभोलकरांचे वैचारिक विरोधक असलेल्या सनातनवर प्रसारमाध्यमांतून लगेचच संशय व्यक्त केला गेला. काँग्रेसही यावर अनुकूल झाली आणि लागलीच ‘ज्या विचारांनी म. गांधीची हत्या केली, त्याच विचारांनी दाभोलकरांची हत्या केली. ही हत्या राजकीय आहे’, असे म्हणत ‘दाभोलकरांची हत्या ही नथुरामी प्रवृत्तीने केली’, असे विधान कोणतेही अन्वेषण झालेले नसतांना काँग्रेसचे नेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत दायित्वशून्यपणे केले. (संदर्भ : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/cm-reaction/articleshow/21934099.cms)
१ आ. २८ ऑगस्ट २०१३ : गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातून एका युवकाला कह्यात घेण्यात आले. ५ घंटे चौकशी करून काहीच निष्पन्न न झाल्याने सनातनच्या साधकाची मुक्तता करण्यात आली. याच काळात कोट्यवधी फोन कॉल्सची (भ्रमणध्वनी संपर्कांची), सनातनशी संबंधित ७०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली.
१ इ. २० जानेवारी २०१४ : कुख्यात शस्त्रतस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक; दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल हस्तगत; ‘दाभोलकरांच्या शरिरात मिळालेल्या गोळ्या नागोरी गँगकडून जप्त करण्यात आलेल्या प्रकारच्या पिस्तुलातून झाडण्यात आल्या’, असा पोलिसांचा दावा ! (संदर्भ : https://lokmat.news18.com/pune/article-111424.html)
१ ई. २२ जानेवारी २०१४ : खुनाच्या संमतीसाठी ‘ए.टी.एस्.’ (आतंकवादविरोधी पथक)चे प्रमुख राकेश मारीया यांनी आपल्याला २५ लाख रुपयांची ‘ऑफर’ (प्रस्ताव) दिली असल्याचा नागोरीचा गौप्यस्फोट (संदर्भ : https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-conducts-narko-test-of-manish-nagori-pune-police-decision-in-the-dabholkar-case-4500850-NOR.html )
१ उ. १६ फेब्रुवारी २०१५ : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर आक्रमण आणि २० फेब्रुवारीला निधन; डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलानेच आणि एकाच मारेकर्याने हत्या केल्याचा आरोप
१ ऊ. ३० ऑगस्ट २०१५ : कर्नाटकातील धारवाड येथे प्रा. कलबुर्गी यांची हत्या.
१ ए. १७ सप्टेंबर २०१५ : कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला अटक.
१ ऐ. २३ ऑगस्ट २०१६ : एकाच पिस्तुलातून तीनही हत्या, ‘फॉरेन्सिक लॅब’चा अहवाल (संदर्भ : https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dabholkar-pansare-and-kalburgi-shot-with-same-gun-scotland-labs-report-5401679-PHO.html )
१ ओ. तीनही हत्यांमध्ये वापरलेले पिस्तूल एकच, हेच संशयास्पद नव्हे का ? : आता प्रश्न उपस्थित होतो की, २० जानेवारी २०१४ या दिवशी नागोरी-खंडेलवाल यांना अटक होते, त्यांच्याकडे पिस्तूल सापडते. तेच पिस्तूल १६ फेब्रुवारी २०१५ आणि ३० ऑगस्ट २०१५ या दिवशी झालेल्या हत्यांच्या वेळी कसे वापरले गेले ? यातून एकतर मारेकर्यांना पोलिसांनी त्यांच्या अधीन असलेले पिस्तूल दिले आणि मारेकर्यांनी हत्या करून पुन्हा पोलिसांच्या हवाली केले किंवा हा दावाच खोटा आहे, असे म्हणण्यास वाव आहे !
१ औ. वर्ष २०१३ ते २०१६ : या काळात ‘रुद्र पाटील ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) आणि सारंग अकोलकर अन् विनय पवार हे मारेकरी असल्याचे, तसेच ते फरार आहेत’, अशी वृत्ते; मात्र अटकेत असलेल्या समीर गायकवाडविषयी काहीही वाच्यता नाही !
१ अं. मे २०१६ : ‘दाभोलकर हत्येप्रकरणी सापडलेल्या पुंगळ्या (बंदुकीच्या गोळीचे आच्छादन) लंडन येथील स्कॉटलंड यार्ड येथे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवायच्या आहेत’, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. प्रत्येक सुनावणीला पोलीस हेच न्यायालयात सांगत राहिले. साधारण ९ मासांनी सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, भारत आणि इंग्लंड यांच्यात फॉरेन्सिक चाचणीविषयी करारच नसल्याने पुंगळ्या पाठवल्याच नाहीत ! म्हणजे ९ मास खोटे बोलून न्यायालयाला सीबीआयने अंधारात ठेवले; पण का ? अन्वेषणाचा, न्यायालयाचा महत्त्वाचा वेळ वाया घालवला. याविषयी कुठेच वाच्यता नाही !
१ क. ५ जून २०१६ : दाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाली आणि सीबीआयकडे अन्वेषण देण्यात आले.
१ ख. १९ जून २०१७ : सनातनचा साधक समीर गायकवाड याला जामीन संमत; स्वाभाविकपणे केवळ दबावतंत्रामुळे अटक केलेल्या आरोपीविषयी कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने जामिनावर सुटका
१ ग. ३० जानेवारी २०१८ : पानसरे हत्या प्रकरणातून डॉ. तावडे यांना जामीन मिळाला, तर दाभोलकर हत्येच्या प्रकरणात अजूनही ते मुख्य सूत्रधार म्हणून अटकेत !
१ घ. १८ ऑगस्ट २०१८ : दाभोलकर हत्या प्रकरणात औरंगाबाद (संभाजीनगर) येथून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक; दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे हेच दोघे असल्याचा सीबीआयचा दावा
२. अन्वेषणाविषयी सर्वसामान्यांना साशंकता
सध्या तरी दाभोलकर हत्या प्रकरणाचा रेंगाळणारे आणि अनेक दगडांवर उड्या मारणारे अन्वेषण येथपर्यंत येऊन पोचले आहे. आता घटनाक्रमात प्रश्न निर्माण होतो की, सनातन आश्रमातील साधकाच्या चौकशीपासून प्रथम मनीष नागोरी-विकास खंडेलवाल, नंतर सारंग अकोलकर-विनय पवार, त्यानंतर समीर गायकवाड-डॉ. वीरेंद्र तावडे आणि अखेर सचिन अंदुरे-शरद कळसकर या जोड्यांपर्यंत आली आहे. यापुढे ‘आणखी कुणी सापडले आणि तेच मारेकरी होते’, असे म्हटले, तर आता आश्चर्य वाटणार नाही. असो. या सर्व प्रक्रियेत खरेतर न्यायालय आणि शासन यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.
३. …याला लोकशाही म्हणता येईल का ?
आपल्या देशात राज्यघटनेने चालणारी लोकशाही व्यवस्था आहे. याच लोकशाहीच्या ४ स्तंभांनी जर योग्य काम केले, तर कोणताही आरोपी सुटणार नाही; पण जर अशा प्रकारे अन्वेषण होत राहिले, तर आणखी किती निष्पापांच्या चौकशा होत रहाणार ? पोलीस ऊठसूट कुणाकुणाला पकडून आणणार ? ‘ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत, त्यांच्यावर अवश्य कठोर कारवाई करा; पण आतापर्यंत अन्वेषणाच्या नावाने जो खेळ चाललेला आहे, तो थांबवला पाहिजे. मारेकरी कुणीही असो, त्याला सोडता कामा नये; पण केवळ ‘वैचारिक विरोध’ हेच सूत्र कायम ठेवून आपले अन्वेषण पूर्वग्रहदूषित किंवा पुरोगाम्यांच्या दबावाखाली तर होत नाही ना ?’, याचे भान यंत्रणांनी ठेवायला हवे.
‘सरकार दबाव आणते’, अशी ओरड नेहमी होत असते, येथे तर एक परिवार (दाभोलकर कुटुंबीय) न्यायालय आणि पोलीस दोघांवर दबाव आणून ‘आम्ही सांगू तेच आरोपी’, असे म्हणत आहे. याला लोकशाही म्हणता येणार का ? ‘आम्ही म्हणू तेच खरे !’, हे विवेकवादाचे लक्षण नाही. हे महाराष्ट्राने स्वीकारूही नये, ती आपली परंपराही नाही. जर पोलीस, न्यायव्यवस्था, सरकार यांना खरेच डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी कोण ? हे निश्चित करून त्यांना शिक्षा व्हावी, असे वाटत असेल, तर १० वर्षांपासून चाललेली ही लपाछपी थांबवून न्यायालयात आरोपींच्या विरोधात खटला चालवला पाहिजे. जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा व्हावी; मात्र जे निष्पाप आहेत, त्यांच्यावर होणारा अन्यायही थांबवलाच पाहिजे, हेच राज्यघटनेला अपेक्षित आहे आणि हाच विवेक नाही का ?
४. असत्याचा आधार विवेकवादी कार्यकर्त्याला कशाला ?
आता तर डॉ. दाभोलकर यांचे सुपुत्र डॉ. हमीद हे ‘आरोपींनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे’, असा प्रचार करत आहेत. एक पत्रकार या नात्याने मी या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीविषयी अद्ययावत असतो; मात्र आजपर्यंत असे न्यायालयात घडलेलेच नाही ! तरी न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन असे वातावरण का निर्माण केले जात आहे ? ‘जर आरोपींना गुन्हा मान्य आहे, तर अजून खटला का चालू आहे ?’, हा प्रश्न रहातोच ! असा असत्याचा आधार विवेकवादी कार्यकर्त्याला कशाला हवा ?
५. सत्याची कास धरायला हवी !
आपली विचारसरणी धर्मपरायण वा नास्तिकतावादी असो, याचा एखाद्या हत्येतील अन्वेषणात अडथळा निर्माण होईल, असे कुणीही वागता कामा नये. दोषी कुणीही असो, त्याची विचारधारा पाहून त्याला फासावर लटकावणे, ही पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा नाही. जो दोषी आहे, त्यालाच शिक्षा व्हायला हवी; मात्र एखाद्या जरी निष्पाप नागरिकाला या प्रक्रियेत त्रास झाला, तर तो लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांचा पराभवच ठरेल, हे नक्की ! त्यामुळे आपण तटस्थपणे या प्रकरणाकडे पाहून सद्सद्विवेकबुद्धीने वागायला हवे आणि सत्याची कास धरायला हवी, एवढीच अपेक्षा !
– एक पत्रकार