भाडेकरूंची माहिती ७ दिवसांत पोलीस ठाण्याला न दिल्यास होणार कारवाई !

रत्नागिरी – घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवतांना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, २ छायाचित्रे आणि त्यांना ओळखणार्‍या व्यक्तीचे नाव, पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र रहातील, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.


जिल्ह्याला २३७ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा आणि मासेमारी व्यवसाय केला जातो. रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथे औद्योगिक वसाहती आहेत. आंबा आणि मासेमारी व्यवसाय करणारे, तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक हे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्य जिल्ह्यांतून, अन्य राज्यांतून, तसेच नेपाळ येथून कामगार येतात. तसेच औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक नोकरी व्यवसाय अन्य कामानिमित्त येवून भाड्याने घरे दुकान गाळे फ्लॅट/फार्म हाऊस घेवून रहातात; परंतु याविषयीची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात येत नाही. आतंकवादी कारवाया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी या माहितीचे साहाय्य होऊ शकेल. याकरता अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये प्रतिबंध आदेश पारीत केला आहे.