सांगली – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १५ ऑगस्टला ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सहस्रो धारकरी, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि भगव्या ध्वज यांना हार अर्पण करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा प्रारंभ झाली. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर पदयात्रेची सांगता झाली. फेरीत अग्रभागी भगवा ध्वज होता, यानंतर भारतमातेची प्रतिमा होती, तसेच धारकरी क्षात्रतेज जागृत करणार्या घोषणा देत होते आणि देशभक्तीपर गीते म्हणण्यात येत होती. धारकरी श्री. हणमंतराव पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
तासगाव – येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपासून यात्रेचा प्रारंभ झाला. गणपति मंदिर, पोस्ट ऑफिस, सिद्धेश्वर रस्ता, बसस्थानक रस्त्यावरून परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर यात्रेची सांगता झाली. शेवटी पदयात्रा काढण्याचा उद्देश सांगून ‘प्रत्येक वर्षी अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे’, असे सांगितले.
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात शिवतीर्थ येथे सकाळी १० वाजता श्री. सहदेवगुरुजी आणि त्यांचे सहकारी पुरोहित यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे वेदमंत्र म्हणत पूजन करण्यात आले. या प्रसंगी तिरंगा राष्ट्रध्वजाला पुष्पहार घालून प्रेरणा मंत्राने या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. विविध मार्गांवरून जाऊन शिवतीर्थावर यात्रेचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाहक श्री. आशीष लोखंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, सुजित कुलकर्णी यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड येथेही पदयात्रा !
कराड – येथील शिवतीर्थापासून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचा प्रारंभ झाला. आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, रविवार पेठ मार्गावरून परत शिवतीर्थावर येऊन पदयात्रेची सांगता झाली. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर आमले, श्रीकृष्ण पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे अजय पावसकर, शिवसेनेचे काकासाहेब जाधव, हिंदु जनजागृती समितीचे अनिल कडणे, मदन सावंत यांसह कराड तालुक्यातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.