‘वर्ष २००८ मध्ये माझा विवाह श्री. रामेश्वर भुकन (सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांचा नातू) यांच्याशी झाला. त्या वेळी सासरी आल्यावर मला समजले, ‘मला दोन सासूबाई आहेत. एक म्हणजे माझ्या सासूबाई (श्रीमती इंदुबाई भुकन, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि दुसर्या म्हणजे त्यांची आई (माझ्या आजेसासूबाई पू. लोखंडेआजी).’ तेव्हा ‘आता माझे कसे होणार ? मला दोन्ही सासूबाई चांगल्या सांभाळतील ना ?’, अशी भीती माझ्या मनात होती; परंतु ‘पू. आजी पुष्कळच प्रेमळ आहेत’, हे काही प्रसंगांतून माझ्या लक्षात आले. ते प्रसंग पुढे दिले आहेत.
१. घरातील सर्व कामांत साहाय्य करणे
अ. पू. आजी मला नेहमी भांडी घासण्यासाठी साहाय्य करायच्या. मी एकटी भांडी घासतांना दिसले की, त्या मला म्हणायच्या, ‘‘एवढ्या लेकराला एवढी मोठी भांडी घासायला लावलीत ?’’ त्या मला भांडी घासून देण्यासाठी साहाय्य करायच्या. चुलीवरील काळी झालेली भांडी त्या स्वतः घासायच्या आणि मला म्हणायच्या, ‘‘ती काळी भांडी तू घासू नकोस. तुझे हात काळे होतील.’’ असे कोणतीही सासू सुनेला म्हणणार नाही. त्या वेळी मला त्यांचा आधार वाटायचा.
आ. मी घरातील सर्वांचे कपडे धूत असले, तर त्या सर्व कपडे दोरीवर वाळत घालायच्या. मी चुलीवर भाकरी करत असले, तर माझा हात भाजेल; म्हणून त्या भाकरी भाजायच्या. त्या कुटुंबियांना म्हणायच्या, ‘‘ती नोकरदाराची लेेक आहे. (माझ्या माहेरचे सर्व शासकीय नोकरी करतात. मीसुद्धा शिक्षिका होते.) तिला चुलीवर भाकरी करणे ठाऊक नाही, तर आपण तिला साहाय्य केले पाहिजे.’’ त्या मला प्रेमाने सांभाळायच्या. त्या मला आजेसासूबाईंऐवजी माझी आजीच वाटायच्या.
२. नोकरीच्या ठिकाणी मुलीला सांभाळणे
पू. आजी माझ्या समवेत माझ्या नोकरीच्या गावी (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे) आल्या होत्या. तेव्हा मी शाळेतून येईपर्यंत त्या स्वयंपाक करून ठेवायच्या. लग्नानंतर ७ वर्षांनी माझी मुलगी कु. वेदश्री (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ९ वर्षे) हिचा जन्म झाल्यावर पू. आजी तिला पुष्कळ प्रेमाने सांभाळायच्या. त्यामुळे मला नोकरीत कोणतीही अडचण आली नाही.
३. जेवण झाले नसल्यास आधी जेवण्यास सांगणे
‘मी जेवण केले कि नाही ?’, हे पू. आजी जेवायला बसण्यापूर्वी मला विचारायच्या आणि म्हणायच्या, ‘‘चल. आधी जेवण करू. बाकीची कामे नंतर करू.’’ आतासुद्धा आम्ही आश्रमातून निवासस्थानी गेल्यावर विचारतात, ‘‘तू जेवलीस ना ?’’
४. मी कधी रुग्णाईत असेन, तर त्या माझ्या जवळ येऊन बसतात. तेव्हा त्या दुखणार्या भागावरून प्रेमाने हात फिरवतात आणि देवाला प्रार्थना करतात.
५. कृतज्ञता
आम्हा भुकन कुटुंबियांवर पू. आजींच्या माध्यमातून देवीचीच कृपा आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला संतांचे प्रेम मिळत आहे. त्यांच्या कृपेनेच आम्हाला पू. आजींचे संतत्व एवढ्या जवळून अनुभवायला मिळत आहे. गुरुदेवांची आम्हा सर्वांवर अपार कृपा आहे.
प.पू. गुरुदेव आणि पू. आजी यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. उर्मिला रामेश्वर भुकन (पू. लोखंडेआजींची नातसून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२२)