औंध (सातारा) येथे १ लाखांची लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना रंगेहात पकडले !

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

सातारा, १२ ऑगस्ट (वार्ता.) – औंध (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेेब नारायण जाधव यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदारांचे मद्यविक्रीचे दुकान असून या दुकानांमधून मद्याची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये साहाय्य करण्यासाठी आणि व्यवसायात यापुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी १ लाख ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारदारांच्या तक्रारीनुसार अन्वेषण केल्यावर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने सापळा रचण्यात आला. औंध पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या वतीने १ लाख रुपये स्वीकारतांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याविषयी औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.