गोवा : मद्यालयांच्या बाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करणार !

अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची उपाययोजना

गोवा पोलीस

पणजी – बाणस्तारी येथे मद्यपी चालकाकडून भीषण अपघात झाल्यानंतर पोलीस यंत्रणा या संदर्भात अधिक सतर्क झाली आहे. बाणस्तारीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यपी चालकाकडून अपघात झाला. त्यामुळे आता मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना रोखून अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मद्यालयांच्या बाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

मद्यालयाबाहेर असणारा पोलीस मद्य पिऊन वाहन चालवू पहाणार्‍याला रोखणार आणि त्याला पर्यायी चालकाची व्यवस्था करण्यास बाध्य करणार आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी वाहने चालवणार्‍या चालकांची ‘अल्कोहोल टेस्ट’ (मद्यप्राशन केले आहे कि नाही, हे ओळखण्यासाठीची चाचणी) करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर १० ऑगस्टच्या रात्री पणजीतील दिवजा सर्कल येथे अनेक वाहनचालकांच्या चाचण्या करण्यात आल्या.


संपादकीय भूमिका

पोलीस असे किती दिवस मद्यालयांच्या बाहेर उभे रहाणार ? त्यापेक्षा लोकांनी मद्यपान करू नये, यासाठी समाजाला साधना शिकवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांची पुढाकार घ्यायला हवा !