१. ठाण्यातील प्रतिष्ठित घराणे असणार्या ठाकूर कुटुंबियांच्या घरात सनातन संस्थेचे सर्व कार्य होत असूनही त्याचा ताण न घेता ठाकूरकाकू सदैव हसतमुख असणे
त्यांचे घर मोठे असल्याने सनातन संस्थेचे सर्व सत्संग, अभ्यासवर्ग, पथनाट्याच्या तालमी इत्यादी सर्वकाही त्यांच्या घरातच होत असे; पण त्याचा ठाकूरकाकूंच्या चेहर्यावर कधीही ताण दिसत नसे. त्या नेहमीच हसतमुख असायच्या.
२. सुगरण
ठाकूरकाकू उत्तम स्वयंपाक करतात. त्यांच्याकडे गेल्यावर त्या साधकांना नवनवीन पदार्थ खाऊ घालतात आणि त्या पदार्थांविषयी नवीन माहितीही सांगतात.
३. तत्परता
त्यांना टंकलेखनासाठी धारिका दिल्यावर कधी घरगुती किंवा शारीरिक अडचणींमुळे धारिका टंकलेखन करता आली नाही, तर त्या त्वरित मला तसा निरोप देतात.
४. मनाचा उदारपणा
साधकांना सेवा करतांना काही अडचणी आल्या किंवा एखादी वस्तू मिळाली नाही, तर काकू सहजतेने त्यांच्या घरातील वस्तू सढळहस्ते देतात.
५. सेवेची तळमळ
५ अ. परिपूर्ण सेवा करणे : सौ. नम्रता ठाकूरकाकूंकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रंथांचा साठा होता. ठाणे जिल्ह्यात ग्रंथप्रदर्शन किंवा साधकांना आवश्यक असणार्या ग्रंथांचे वितरण करण्याची सेवा होती. माझ्याकडे ठाण्यातील काही भागांतील ग्रंथांची देवाण-घेवाण करण्याची सेवा होती. मी त्या सेवेचा आढावा ठाकूरकाकूंना देत असे. ठाकूरकाकू संपूर्ण ठाण्याचा आढावा एकत्र करून पुढे देत असत. त्यामुळे प्रत्येक मासाला माझी त्यांच्याशी भेट होत असे. त्या कितीही व्यस्त असल्या, तरी मी आढावा देतांना ‘प्रत्यक्ष ग्रंथांचा साठा आणि वितरण झालेल्या ग्रंथांची संख्या जुळत आहे ना ?’, हे त्या पहात असत. त्यातून त्यांचे सेवेविषयी असलेले गांभीर्य आणि तळमळ मला शिकता आली.
५ आ. शारीरिकदृष्ट्या थकवा असूनही तळमळीने सेवा करणे : ठाण्यात महाशिवरात्र आणि श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन या दिवशी ग्रंथप्रदर्शन लावले जाते. ठाकूरकाकूंना शारीरिकदृष्ट्या होत नसूनही त्या दुसर्या साधकांचे साहाय्य घेऊन ग्रंथप्रदर्शन सेवेसाठी वेळेत उपस्थित राहून तळमळीने सेवा करत असत.
५ इ. सेवा वेळेत करून पाठवणे : मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आल्यावर त्यांना ‘इ मेल’द्वारे टंकलेखनासाठी धारिका देत असे. मी त्यांना कधी ‘तातडीची धारिका आहे आणि लवकर करून पाठवा’, असे सांगितल्यावर त्या वेळेत धारिका पूर्ण करून देत असत.
६. ठाकूरकाकूंचे घर म्हणजे सनातनचे छोटे सेवाकेंद्रच होणे
ठाकूरकाकूंचे घर ठाण्यात मध्यवर्ती असल्याने साधक ‘निरोप किंवा सत्संगांसाठी किंवा लागणारे इतर साहित्य’ या सगळ्याच गोष्टी त्यांच्या घरात ठेवत असत. ठाकूरकाकू आठवणीने प्रत्येकाला त्याचा त्याचा निरोप देत असत. साहित्यासाठीही त्यांनी एक कार्यपद्धत घातली होती. त्यामुळे त्यांचे घर म्हणजे सनातन संस्थेचे छोटे सेवाकेंद्रच झाले होते.
‘हे गुरुदेवा, हे लिखाण माझ्याकडून लिहून घेतल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (७.८.२०२३)
प्रेमाने आणि आपुलकीने साधकांना अविरत साहाय्य करणार्या सौ. नम्रता ठाकूर !
१. ठाकूर कुटुंबियांनी घरात सनातन संस्थेचे सर्व कार्य आनंदाने होऊ देणे
‘वर्ष १९९७ पासून सौ. नम्रता ठाकूरकाकू यांच्या घरी सत्संग आणि साधकांच्या नियमित सेवा चालू झाल्या. सर्व साधकांना ठाकूरकाकूंचे घर हक्काचे वाटत असे. तेव्हा गुरुपौर्णिमा आणि प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) होणार्या जाहीर सभा या सर्व सेवांसाठी साधकांची ऊठबस ठाकूरकाकूंच्या घरीच होत असे. त्यांचे एकत्र कुटुंब असूनही त्यांच्या घरातील सर्वच मंडळी साधकांची पुष्कळ प्रेमाने विचारपूस करून साधकांचे आदरातिथ्य करत असत.
२. प्रेमळ
त्यांच्याकडे कुठल्याही वेळी सेवेसाठी गेल्यास काकू प्रेमाने खाऊ दिल्याविना सोडत नसत.
३. ठाकूरकाकूंनी त्यांचा संगणक साधकांना सेवा करण्यासाठी देऊन नंतर स्वतःही संगणक शिकून त्यावर टंकलेखनाची सेवा करणे
ठाकूरकाकूंच्या घरी त्यांचा संगणक होता. त्या काळात ‘घरी संगणक असणे’, ही फार दुर्मिळ गोष्ट होती. तेव्हाही ठाकूरकाकूंनी त्यांच्या घरातील संगणक साधकांना सेवेसाठी वापरण्यास दिला. त्या संगणकात आवश्यक ती प्रणाली घालून साधक त्यावर सेवा करत असत. ठाकूरकाकूंच्या संगणकावर सनातनच्या गुजराती भाषेतील ‘शक्ती’ या ग्रंथाचे टंकलेखन झाले होते. गुरुपौर्णिमेच्या काळात निघणार्या स्मरणिकांच्या विज्ञापनांची संरचना आणि टंकलेखन त्यावरच होत असे. इतर साधकांच्या समवेत ठाकूरकाकूंनीही संगणकीय सेवा शिकून घेतल्या होत्या. तेव्हापासून काकू आजारी पडेपर्यंत टंकलेखनाची सेवा करत होत्या. काही वर्षांपासून त्यांना रामनाथी (गोवा) येथून टंकलेखनाची सेवा पाठवण्यात येत होती.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा
ठाकूरकाकूंच्या आयुष्यात बरेच चढ-उताराचे प्रसंग आले; पण गुरुदेवांवरील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील) दृढ श्रद्धेने आणि धैर्याने त्या सर्व प्रसंगांना सामोरे गेल्या.’
– सौ. मनीषा पानसरे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (७.८.२०२३)