एक काळ असा होता, जेव्हा केवळ लहान मुलेच खेळतांना दिसत असत आणि आताचा काळ असा आहे की, लहानांपेक्षा मोठेच अधिक संख्येने खेळतांना दिसतात ! ‘ऑनलाईन गेम्स’चे आजमितीला एवढे प्रस्थ वाढले आहे की, एखाद्याच्या भ्रमणभाषमध्ये ‘गेमिंग अॅप’ नसणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाऊ लागले आहे. सध्या आघाडीवर असलेले बहुसंख्य चित्रपट कलावंत आणि खेळाडू ‘ऑनलाईन गेम्स’ची विज्ञापने करतांना अन् त्या माध्यमातून लोकांना भरघोस रकमेची पारितोषिके जिंकण्याची हमी देतांना दिसत आहेत. दूरचित्रवाहिनी, वृत्तपत्रे, रस्त्यांवरील ‘होर्डिंग्ज’, बस, रेल्वे सर्वच ठिकाणी या विज्ञापनांचे पेव फुटलेले आहे. सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे या विज्ञापनांमध्येसुद्धा धोक्याची सूचना छापलेली असते; मात्र त्याकडे लोकांचे फारसे लक्ष जाणार नाही, याची काळजीही विज्ञापनकर्त्यांनी मोठ्या खुबीने घेतलेली असते.
आजमितीला मोठा तरुणवर्ग या ‘ऑनलाईन गेम्स’च्या आहारी गेलेला आहे. या खेळामध्ये आरंभी पैसे मिळतात. त्यामुळे खेळावरील विश्वास वाढीस लागतो. ‘अधिक पैसे गुंतवल्यास अधिक पैसे मिळतील’, या अपेक्षेने खेळणारे त्यामध्ये अधिकाधिक पैसे गुंतवू लागतात. ‘आज हरलो, तरी उद्या नक्कीच जिंकू’, या आशेने कर्ज काढतात, घरातील दागिने विकतात, भूमी गहाण ठेवतात; मात्र अनेकांच्या जीवनात जिंकवून देणारा तो ‘उद्या’ काही उजाडतच नाही. अशा शेकडो घटना आहेत.
सर्वस्व गमावणार्या काहींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर काही मनोरुग्ण झाले. अर्थात् प्रतिदिन खेळणार्यांना हे ठाऊक नाही असेही नव्हे, व्यसनांचेे काय परिणाम होतात, हे ठाऊक असूनही त्यांचे व्यसन करणार्यांचे प्रमाण जसे घटलेले नाही, तसे आजच्या पिढीला ‘ऑनलाईन गेम्स’चे एवढे वेड लागले आहे की, त्याचे दुष्परिणाम लक्षात घेण्याएवढे भानही रहात नाही. ‘अधिक धनाची लालसा’ हेच या खेळाचे, म्हणजे जुगाराचे पेव फुटण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. जुगार खेळणारी व्यक्ती स्वार्थाचा विचार करते. त्यामुळे जुगार खेळणे हे पापकर्म आहे. जुगार खेळणार्या आणि तो आयोजित करणार्या व्यक्तीला शिक्षेचे प्रावधान आहे. अनेकांना जीवनातून उठवणारे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि वैचारिक हानी करून आयुष्य उद़्ध्वस्त करणारे ‘ऑनलाईन गेम्स’ मात्र महसूल पुरवत असल्याने ‘कौशल्या’च्या नावाखाली चालू आहेत. हे पालटायला हवे.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई