या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. जुगलकिशोर वैष्णव आणि श्री. योगेश चौगुले यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ भेट दिला. |
निपाणी (कर्नाटक) – गांधींच्या अहिंसा तत्त्वामुळे हिंदूंमधील क्षात्रवृत्ती लोप पावली, ही हिंदु समाजाची फार मोठी हानी झाली. याउलट स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्याचे यज्ञकुंड होते. त्या काळातील प्रत्येक क्रांतीकारकांसाठी ते आदर्श होते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना सातत्याने अपमानीत करण्यात आले. आता त्यांचा बहुमान करण्याची वेळ आली आहे. तरी स्वातंत्र्यवीरांना अधिकाधिक समजून घ्या आणि त्यांचे विचार इतरांपर्यंत पोचवा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्र पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने श्री. शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. या प्रसंगी अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, श्री. अभय मानवी, श्री. अभय देशपांडे उपस्थित होते.
श्री. शरद पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘जो हिंदु हितकी बात करेगा वही देशपे राज करेगा’ हा मूलमंत्र आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. जगाचा इतिहास पाहिल्यास अहिंसेने कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. सध्या हिंदु धर्मावर आघात करण्याचे राजकारण चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला सावरकर हे अधिक डोळसपणे वाचले पाहिजेत.’’