विश्वहित साधणार्या वेदपरंपरांचे रक्षण आणि प्रसार हेच मानवजातीच्या सुखसमृद्धीचे मूळ आहे !
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांची प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतीच भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी ‘वेदरक्षणाच्या परंपरा विस्तारल्या पाहिजेत’, असे उद़्गार काढले. या वेळी ते म्हणाले, ‘‘ही वेळ सनातन धर्माच्या उत्थानाची आहे. भारत संपूर्ण जगाला धर्माचे ज्ञान देईल. अजूनही वेदांविषयी पूर्ण माहिती आपल्याला नाही. परकियांच्या आक्रमणाने वेदिक ज्ञानाची हानी झाली. तरीही काही अनुयायांनी युगानुयुगे त्याचे रक्षण केले आहे.’’
ब्रह्मदेवापासूनच नादब्रह्म, शब्दब्रह्म ॐकार आणि त्यातून वेदांची निर्मिती झाली. सत्ययुगाच्या पूर्वीच ही निर्मिती झाल्याने ते ‘अनादि’ आहेत. ‘सृष्टीची निर्मिती वेदांपासून झाली’, असे आदी शंकराचार्यांनी म्हटले आहे. हिंदु धर्मशास्त्रानुसार सृष्टीनिर्मितीला ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. यावरून वेदनिर्मितीचा काळ लक्षात येईल. आरंभी एक वेद होता. वेदांतील ज्ञान समजण्यासाठी व्यासमुनींनी द्वापारयुगाच्या अंती त्याचे स्पष्टपणे ४ भाग केले. पुढे त्याचे उपवेद झाले. पुढच्या काळात वेदांचे ज्ञान समजून घेण्यासाठी संहिता, ब्राह्मणे, अरण्यके, दर्शने, वेदांगे आदी प्रकारांतील विपुल ग्रंथसंपदा निर्माण झाली. एवढ्यावरून वेदांची महानता कुणालाही लक्षात येईल. विज्ञानापासून आत्मज्ञानापर्यंत जगातील कणाकणाचे, म्हणजेच सर्वांगांचे ज्ञान अंतर्भूत असलेली आपली वेदशास्त्रसंपन्न संस्कृती असल्यामुळे भारत एकेकाळी विश्वगुरु होता आणि पृथ्वीवर राज्य करत होता. कालमहिम्यानुसार वेदांचे ज्ञान लोप पावले आहे; परंतु कलियुगांतर्गत सत्ययुगाचा प्रारंभ लवकरच होणार असल्याचे संत सांगत असल्याने पुन्हा एकदा हे वेदांचे ज्ञान पुनरुज्जीवित होण्याचा काळ चालू झाला आहे. सरसंघचालकांचे वरील वक्तव्य हे त्याचेच द्योतक आहे.
आता विदेशींकडून तरी शिका !
जर्मनीने वेदांचा सखोल अभ्यास करून अनेक शोध लावले आहेत आणि ते विज्ञानाच्या नावाखाली आज प्रसिद्ध होत आहेत. हेच काम भारत करू शकला नसता का ? दुर्दैवाने कपटी इंग्रज राज्यकर्ते आणि त्यांचे अनुयायी हिंदुद्वेषी नेहरू यांनी हे होऊ दिले नाही. आता भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये याविषयीच्या अभ्यासवर्गांना आरंभ झाला आहे. नाशिक सौरभ हरदास या एम्.बी.ए. करणार्या विद्यार्थ्याने वेदांचा अभ्यास केला आहे. ‘मार्केटिंग’ जगतात वेदांचा कसा वापर होतो’, हे तो सांगतो. ‘जगाने आज तंत्रज्ञानात कितीही भरारी मारली, तरी वेद हेच सर्व गोष्टींचे मूळ आहे’, असे त्याने म्हटले आहे. जहाजापासून विमान बांधणीपर्यंत, ज्योतिषापासून खगोलशास्त्रापर्यंत आणि गर्भाच्या वाढीपासून ‘टेस्ट ट्यूब बेबी’पर्यंत सर्व काही ज्ञान वेदांमध्ये उपलब्ध असतांना ‘या ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे’, असा सरसंघचालकांच्या म्हणण्याचा सारांश आहे. अथर्ववेदात विमानबांधणीचे सखोल ज्ञान असतांना त्याचे श्रेय मात्र आज ‘राईट’बंधूंकडे जाते. असे सर्वच गोष्टींत होत आहे. स्थापत्य, माहिती तंत्रज्ञान, कला, युद्धशास्त्र, कृषी, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र, औषधशास्त्र, वीणकाम, सुतारकाम, लोहारकाम, खाणकाम, दागिने घडवणे, तेल काढणे आदी सार्यांचेच मूळ वेदांमध्ये आहे.
वर्ष २०१३ मध्ये गोवा येथे पार पडलेल्या क्षेत्रीय वेद संमेलनात महामंडलेश्वर डॉ. शिवस्वरूपानंद सरस्वती म्हणाले होते, ‘‘मंगळ, बृहस्पती आदी ग्रहांवर जल, जीवसृष्टी आहे, हे वेदांमध्ये लिहिलेले आहे. विंचू दंशाचे अंगात भिनलेले विष अमेरिकेतील डॉक्टरांना काढायला जमत नाही. ते केवळ वैदिक मंत्रांच्या उच्चाराने आपल्या भारतातील अशिक्षितही उतरवू शकतो. वेदांमध्ये असे महान मंत्रविज्ञान आहे. परकीय आक्रमणे आणि आम्ही केलेली अवहेलना यांमुळे वेदविद्येचा अभ्यास न्यून झाला.’’
…तर पुन्हा सुवर्णकाळ येईल !
‘वेदांचे ज्ञान परिपूर्ण, कुठलाही दुष्परिणाम निर्माण न करणारे आणि सार्या मानवजातीसह सृष्टीचे हित चिंतणारे आहे’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विज्ञानाचे आगर असलेल्या वेदांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवून त्यांचे पालन केले, तर देशात पुन्हा सुवर्णकाळ येईल. आपल्या ऋषिमुनींनी ‘मानवाने जगावे कसे ?’ हे सांगणारा सर्वोत्तम ठेवा संपूर्ण विश्वासाठी आपल्याकडे ठेवला आहे. त्याचे अनुयायी होतो, तोपर्यंत आपण उर्जितावस्थेत होतो. त्यामुळे आता परत वेदानुयायी होण्याची वेळ आली आहे, हे सरसंघचालकांच्या विधानावरून लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा आपण कुठलेही कार्य करतांना ‘वेदप्रमाण’ असे म्हणतो, तेव्हा साक्षात् देवच आपल्याला आशीर्वाद देतो. यातून वेदांचे महत्त्व लक्षात येते. ‘वेदप्रमाण’ हाच खरा मंत्र आहे. ‘वेदप्रमाण’ एवढे म्हटल्यानेही देवाची कृपा होऊन रक्षण होते. भक्तांना तशी प्रचीती येते.
वेद जागवा, देश वाचवा !
आज देशाची स्थिती पाहिली, तर रज-तमाचा वणवा पेटलेला दिसत आहे. प्रत्येक राज्य होरपळत आहे. सर्व स्तरांवरील संघर्षाची धार वाढली आहे. कधी नव्हे एवढी हिंदु अस्मिता आणि संघटन अन् त्यांच्यातील क्षात्र, तसेच ब्राह्म तेज जागृत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वेदांमध्ये देशातील ऐक्य साधू शकणारी या ग्रंथात फार मोठी शक्ती आणि मूल्ये आहेत. सर्व हिंदूंमधील एकसंधतेचा दुवा सनातन ‘वैदिक संस्कृती’ हाच आहे, त्यामुळे वेद आणि आनुषंगिक शास्त्रे सामाजिक पालटांनुसार सोप्या शब्दांत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे, शाळा-महाविद्यालयांतून शिकवणे आवश्यक आहे. तरच सरसंघचालकांना वेदांचा प्रसार म्हणतांना जे अभिप्रेत आहे, ते साध्य होण्यास आरंभ होऊ शकेल. वेदांचा दृकश्राव्य पद्धतीने प्रचार झाल्यास अल्प; मात्र गुरु-शिष्य परंपरेनुसार अध्ययन केल्यास पूर्ण लाभ होऊ शकतो. वेदांचे रक्षण केल्यासच ते आपले (मानवाचे) भविष्यात रक्षण करणार आहेत आणि भारताकडे त्याचे दायित्व ओघाने येते !