मुंबई – भाडेतत्त्वावरील १ सहस्र ६७१ बसगाड्यांच्या चालकांनी बंद पुकारला आहे. या गाड्यांऐवजी आतापर्यंत एस्.टी. महामंडळ आणि खासगी आस्थापने यांकडून १ सहस्र २७१ गाड्या आम्ही उपलब्ध केल्या आहेत. उर्वरित ४०० गाड्या ८ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ७ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केला.
बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. @MPLodha pic.twitter.com/nAqy64YS0q
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 7, 2023
या वेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘‘मुंबई महानगरपालिकेकडून ३ सहस्र ५२ बसगाड्या चालवल्या जातात. यांतील १ सहस्र ३८१ गाड्या मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या आहेत. हा प्रश्न खासगी बसगाड्यांच्या चालकांचा आहे. ‘या चालकांना योग्य वेतन देण्यात यावे’, याविषयी त्यांच्या मालकांशी बोलणे चालू आहे. यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास देणे उचित नाही. मुंबईकरांच्या सेवेसाठी जेवढ्या बसगाड्या आवश्यक आहेत, त्या गाड्या आम्ही उपलब्ध करून देऊ.’’