नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

तहसीलादर नरेशकुमार बहिरम

नाशिक – मुरूम उत्‍खननाविषयी पाचपट दंड आणि स्‍वामित्‍व धन जागाभाडे मिळून १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड अल्‍प करण्‍यासाठी, तसेच स्‍थळ निरीक्षणासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना येथील तहसीलादर नरेशकुमार बहिरम (वय ४४ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने ५ ऑगस्‍ट या दिवशी रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

१. दंडाची आकारणी केल्‍यानंतर याविषयी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्‍या कार्यालयाचे आदेश आले होते. याविरोधात भूमी मालकाने आदेशाच्‍या फेरचौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्‍याकडे अपील प्रविष्‍ट केले होते.

२. ‘मिळकतीमधील उत्‍खनन केलेला मुरूम त्‍याच जागेत वापरला आहे’, असे भूमी मालकाने प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. याच्‍या पडताळणीसाठी बहिरम यांनी भूमी मालकाला बोलावले होते; पण मालक वयोवृद्ध आणि आजारी असल्‍याने त्‍यांनी तक्रारदारांना कायदेशीर कारवाईसाठी अधिकारपत्र दिले होते.

३. तक्रारदार तहसीलदारांना भेटल्‍यावर त्‍यांनी तडजोडीसाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्‍यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्‍या घराच्‍या झडतीत ४ लाख ८० सहस्र रोख रक्‍कम, ४० तोळे सोने, १५ तोळे चांदीचे दागिने आणि इतर कागदपत्रे असा जवळपास २५ लाख रुपयांचा माल प्राथमिक अन्‍वेषणात आढळून आला आहे.

संपादकीय भूमिका

भ्रष्‍टाचाराने पोखरलेला महसूल विभाग !

भ्रष्‍ट अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होण्‍याचा कायदा नसल्‍याने शासकीय अधिकारी अशा प्रकरणात सुटतात, याकडे सरकारने लक्ष द्यावे !