कारवाईनंतरही अवैध उत्खनन चालू राहिल्यास १५ ऑगस्टला ग्रामस्थ उपोषण करणार
मालवण – येथील कालावल खाडीत अनधिकृतरित्या चालू असलेले वाळूचे उत्खनन रोखण्यासाठी ‘खोतजुवा बेट’ येथील संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेताच महसूल विभाग आणि पोलीस यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. (पोलीस आणि महसूल विभाग यांनी ही कृती आधीच का केली नाही ? ग्रामस्थांच्या मागणीवर कृती करणारे नको, तर अवैध गोष्टी स्वत:हून थांबवणारे पोलीस प्रशासन हवे ! – संपादक) या वेळी ४ नौकांवर कारवाई करण्यात आली, तर काही नौका घेऊन वाळू उपसा करणारे पसार झाले. ‘कारवाई होऊनही वाळू उत्खनन चालू राहिल्यास १५ ऑगस्ट या दिवशी उपोषण करू’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी प्रशासनास दिली आहे.
‘खोतजुवा बेट’ येथील रहिवासी महिला आणि ग्रामस्थ यांनी अनधिकृत वाळू उत्खननाविषयी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नव्हती. (अशांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – संपादक) त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेऊन अनेक तक्रारी केल्या. सर्व तक्रारी ऐकून घेतल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार झालटे यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांसह छोट्या नौकेतून कालावल खाडीच्या पात्रातून कुठे कुठे वाळूचा अवैधरित्या उपसा केला जातो, याची पहाणी केली.
१२ परप्रांतीय कामगारांवर पोलिसांची कारवाई
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने वाळू उत्खनन करणार्या येथील १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यास सांगण्यात आले.