कराड (जिल्‍हा सातारा) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे मिलिंद वडणगेकर यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

‘वर्ष १९९७ ते वर्ष २००२ या कालावधीत मी कराड (जिल्‍हा सातारा) येथे कुटुंबाच्‍या समवेत रहात असतांना आमचा साधनेच्‍या निमित्ताने मिलिंद वडणगेकर आणि त्‍यांचे कुटुंबीय यांच्‍याशी सतत संपर्क येत होता. मिलिंद वडणगेकर अत्‍यंत विनम्र, मितभाषी आणि आनंदी होते. त्‍यांचा सहवास साधकांसह त्‍यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनाही प्रिय होता.

२.७.२०२३ या दिवशी रात्री ११.१४ वाजता मिलिंद वडणगेकर (वय ६१ वर्षे) यांचे हृदयविकाराने अकस्‍मात् निधन झाले. ही वार्ता ऐकल्‍यावर माझ्‍या मनात त्‍यांच्‍या संदर्भातील जुन्‍या स्‍मृती जागृत झाल्‍या. तेव्‍हा देवाने मला त्‍यांचा अकस्‍मात् झालेला मृत्‍यू आणि त्‍यांचा मृत्‍यूत्तर प्रवास यांच्‍या संदर्भातील पुढील सूत्रेही उलगडून सांगितली. ईश्‍वराच्‍या प्रेरणेमुळेच माझ्‍याकडून कै. मिलिंद वडणगेकर यांच्‍या संदर्भात लेख लिहिला गेला. कै. वडणगेकरकाका यांच्‍या प्रती श्रद्धांजली व्‍यक्‍त करण्‍यासाठी मी हा लेख त्‍यांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

कै. मिलिंद वडणगेकर

१. आंतरिक साधना चांगली असल्‍याने वडणगेकरकाकांना स्‍वतःच्‍या मृत्‍यूची पूर्वसूचना मिळणे आणि त्‍यांनी त्‍याची कल्‍पना इतरांना देणे

मिलिंद वडणगेकर यांची आंतरिक साधना पुष्‍कळ चांगली होती. त्‍यामुळे त्‍यांना ईश्‍वरी प्रेरणेने स्‍वतःच्‍या मृत्‍यूची पूर्वसूचना मिळाली होती. त्‍यामुळे त्‍यांनी त्‍याची कल्‍पना कुटुंबीय, साधक आणि त्‍यांच्‍या शेजारी रहाणार्‍या व्‍यक्‍ती यांना दिली होती. यावरून लक्षात येते, ‘त्‍यांनी अत्‍यंत स्‍थिर राहून स्‍वतःचा मृत्‍यू स्‍वीकारला होता.’

२. मृत्‍यूनंतर १४ व्‍या दिवशी आध्‍यात्मिक उन्‍नती होऊन कै. वडणगेकर यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के होणे

काकांच्‍या मृत्‍यूपूर्वी त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ५९ टक्‍के होती. श्री गुरुकृपेने काकांना त्‍यांच्‍या मृत्‍यूची पूर्वसूचना मिळाली होती. त्‍यामुळे जेव्‍हा मृत्‍यूचा क्षण आला, तेव्‍हा त्‍यांनी ईश्‍वरेच्‍छा स्‍वीकारली आणि ते मृत्‍यूला शांतपणे सामोरे गेले. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतरच्‍या १४ व्‍या दिवशी त्‍यांचे मृत्‍यूत्तर क्रियाकर्म पूर्ण झाल्‍यावर काकांच्‍या चित्तातील (अंतर्मनातील) सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती असणार्‍या व्‍यक्‍त भावाचे रूपांतर अव्‍यक्‍त भावात होऊ लागले. त्‍यामुळे काकांची सगुण स्‍तरावरील साधना संपुष्‍टात येऊन त्‍यांची निर्गुण स्‍तरावरील साधना चालू झाली. त्‍यामुळे ‘मृत्‍यूनंतर १४ व्‍या दिवशी त्‍यांची आणखी आध्‍यात्मिक उन्‍नती होऊन त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी प्राप्‍त केली’, असे मला जाणवले.

३. कै. वडणगेकर यांनी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘माझ्‍या कुटुंबाचा प्रतिपाळ आणि उद्धार करा’, अशी प्रार्थना करणे अन् परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी त्‍यांना तसा आशीर्वाद देणे

काकांवरील श्री गुरुकृपेमुळे त्‍यांनी त्‍यांचे मृत्‍यूत्तर क्रियाकर्म साक्षीभावाने पाहिले आणि त्‍यांच्‍या संपूर्ण कुटुंबाला श्री गुरुचरणी समर्पित केले. ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून म्‍हणाले, ‘गुरुदेवा, मला माझी काळजी वाटत नाही; कारण तुम्‍ही सतत माझ्‍या समवेत आहात. मला केवळ माझ्‍या कुटुंबाची काळजी वाटते. यासाठी मी माझे संपूर्ण कुटुंब तुमच्‍या चरणी अर्पण करतो. तुम्‍हीच त्‍यांचा प्रतिपाळ आणि उद्धार करावा’, अशी तुमच्‍या चरणी या दीन दासाची विनम्र प्रार्थना आहे.’ दत्तस्‍वरूपातील गुरुदेवांनी ‘तथास्‍तु’ म्‍हणून त्‍यांना कृपाशीर्वाद दिला.

४. कै. वडणगेकर यांची आध्‍यात्मिक उन्‍नती होऊन त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठण्‍यामागे साहाय्‍यभूत असणारी त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये

कु. मधुरा भिकाजी भोसले

४ अ. सेवाभाव : काकांनी आयुष्‍यभर श्री गुरूंची सेवा अत्‍यंत मनोभावे आणि सेवाभावाने केली. रुग्‍णालयात भरती होईपर्यंत ते अखंड सेवारत होते.

४ आ. साधकत्‍व : काका सनातनचे चांगले साधक आणि श्री गुरूंचे उत्तम शिष्‍य होते. त्‍यामुळे यमदेवाने त्‍यांच्‍यावर कृपा करून त्‍यांचे मृत्‍यूसमयीचे प्रारब्‍ध सुसह्य केले. त्‍यामुळे काकांना अत्‍यल्‍प शारीरिक वेदना होऊन आनंदावस्‍थेत त्‍यांचा मृत्‍यू झाला.

४ इ. अल्‍प अहं असणे : काकांचा अहं अत्‍यल्‍प होता. त्‍यामुळे त्‍यांना कुणीही चूक सांगितली, तर ते ती चूक मनापासून त्‍वरित स्‍वीकारायचे आणि ‘ती चूक पुन्‍हा होऊ नये’, यासाठी प्रयत्न करायचे.

४ ई. सकारात्‍मक : काका त्‍यांच्‍या जीवनात घडलेल्‍या विविध घटनांकडे सकारात्‍मक राहून पहायचे.

४ उ. स्‍वतःला पालटण्‍याची तळमळ : ते परिस्‍थिती किंवा व्‍यक्‍ती यांना दोष न देता ‘स्‍वतःमधील त्रुटी शोधून त्‍या दूर करणे आणि आवश्‍यक असणार्‍या सद़्‍गुणांचे संवर्धन करणे’, यांवर विशेष भर द्यायचे. त्‍यामुळे काका साधक आणि परिस्‍थिती यांच्‍याशी त्‍वरित जुळवून घ्‍यायचे.

४ ऊ. विनयशील : त्‍यांच्‍या विनयशील स्‍वभावाने प्रभावित होऊन अनेक लोक त्‍यांनी सांगितलेली साधना आणि धर्माचरणाच्‍या कृती करण्‍यास सहजरित्‍या उद्युक्‍त होत असत.

४ ए. दत्तगुरूंची कृपा असल्‍याने मायेत असूनही मायेपासून अलिप्‍त असणे : काकांची गत १० जन्‍मांची साधना असल्‍यामुळे ते गृहस्‍थाश्रमी जीवन जगत असले, तरी या जन्‍मात त्‍यांचा मायेकडील कल अल्‍प होता. त्‍यांच्‍यावर दत्तगुरूंची कृपा झाली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या चित्तावरील मायेचा प्रभाव न्‍यून होऊन ते गृहस्‍थाश्रमातील सर्व कार्ये कर्तव्‍यबुद्धीने पूर्णपणे करत असूनही मायेत गुंतले नव्‍हते. त्‍यांच्‍यातील या वैराग्‍यामुळे ते एकप्रकारे ‘मायेत असूनही नसल्‍याप्रमाणे’, म्‍हणजे मायेपासून अलिप्‍त होते.

४ ऐ. अंतर्मुख वृत्ती : काकांची वृत्ती अंतर्मुख असल्‍यामुळे ते मितभाषी होते, तरीही समाजातील अनेक व्‍यक्‍ती आणि साधक यांना काकांविषयी पुष्‍कळ जवळीक वाटत असे. सर्व साधकांना त्‍यांचे हे गुणवैशिष्‍ट्य प्रकर्षाने जाणवत असे.

४ ओ. परिपूर्ण सेवा करणे : काकांनी मागील १० जन्‍मांत प्रामुख्‍याने कर्ममार्गानुसार साधना केल्‍यामुळे ‘प्रत्‍येक कृती परिपूर्ण करून ती श्री गुरूंच्‍या चरणी अर्पण करणे’, याकडे त्‍यांचे विशेष लक्ष होते. त्‍यामुळे सेवेच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे भगवंताशी सतत अनुसंधान चालू होते.

४ औ. निर्मळ चित्त : काकांनी मागील १० जन्‍मांत भक्‍तीयोगानुसार साधना केल्‍यामुळे त्‍यांचे चित्त निर्मळ झाले होते. त्‍यामुळे ते प्रांजळपणे, प्रामाणिकपणे आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून जीवन जगले.

४ अं. ते भगवंताच्‍या अखंड अनुसंधानात असल्‍यामुळे सतत उत्‍साही, आनंदी आणि समाधानी असायचे.

५. विविध योगमार्गांनी साधना केल्‍यामुळे या जन्‍मात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होणे

६. काळानुसार कै. मिलिंद वडणगेकर यांच्‍या आध्‍यात्मिक पातळीत झालेली वाढ (टक्‍के) आणि कुंडलिनीशक्‍तीचा प्रवास

७. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे काकांचा वेदनादायी मृत्‍यू सुसह्य होणे आणि त्‍यांची जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍तता होणे 

काकांंच्‍या १० जन्‍मांतील विविध योगमार्गांनुसार त्‍यांची व्‍यष्‍टी साधना प्रामुख्‍याने झाली होती. या जन्‍मामध्‍ये त्‍यांनी दत्तस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली धर्म आणि अध्‍यात्‍म यांच्‍या प्रसाराची समष्‍टी साधना केली. त्‍यांच्‍या व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेमुळे त्‍यांच्‍यात विकसित झालेल्‍या सद़्‍गुणांमुळे त्‍यांच्‍यावर दत्तस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा झाली. काकांमधील ‘गुर्वाज्ञेचे पालन मनापासून करणे आणि जीवनाच्‍या शेवटच्‍या क्षणापर्यंत अचूक, परिपूर्ण आणि भावपूर्ण गुरुसेवा करणे’, या गुणांमुळे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काकांवर कृपा करून त्‍यांचा वेदनादायी मृत्‍यू सुसह्य केला, तसेच त्‍यांची आध्‍यात्मिक उन्‍नती करून घेऊन त्‍यांना जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त केले.

८. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी काकांचा ज्‍योतीच्‍या स्‍वरूपातील लिंगदेह स्‍वतःच्‍या ओंजळीत घेऊन तो त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर १४ दिवस सांभाळणे आणि त्‍यानंतर त्‍या लिंगदेहाने महर्लोकात प्रवेश करणे 

काकांचा मृत्‍यू आषाढ पौर्णिमेला, म्‍हणजे गुरुपौर्णिमेला झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर श्री गुरूंची विशेष कृपा होती. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काकांचा ज्‍योतीच्‍या स्‍वरूपातील लिंगदेह स्‍वतःच्‍या ओंजळीत घेऊन तो त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर १४ दिवस सांभाळला’, याबद्दल काकांनी श्री गुरुचरणी अनन्‍यभावाने कृतज्ञता व्‍यक्‍त केली. त्‍यानंतर १४ दिवसांच्‍या अल्‍प कालावधीत या लिंगदेहरूपी ज्‍योतीने पृथ्‍वीची कक्षा पार करून थेट आकाशमार्गाने, म्‍हणजे देवयानमार्गाने सूक्ष्मातून प्रवास करून महर्लोकात प्रवेश केला.

९. काका महर्लोकात पुढील साधना करून संतपद प्राप्‍त करणार असणे आणि पुढच्‍या जन्‍मी ते संत म्‍हणून जन्‍माला येणार असणे

आता काका पुढील साधना महर्लोकवासी असणार्‍या सनातनच्‍या दिवंगत साधकांच्‍या सत्‍संगात राहून आणि जनलोकवासी सनातनच्‍या दिवंगत संतांच्‍या मार्गदर्शनाखाली करून काही वर्षांनी संतपद प्राप्‍त करणार आहेत. त्‍यामुळे ते जेव्‍हा पुढच्‍या जन्‍मी पृथ्‍वीवर जन्‍माला येतील, तेव्‍हा ते जन्‍मतःच संत असणार आहेत.

१०. कृतज्ञता

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे मला कै. वडणगेकरकाकांची विविध गुणवैशिष्‍ट्ये शिकता आली आणि त्‍यांच्‍या जीवनातील विविध घटनांमागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव उमजला’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांनी आम्‍हा सर्व साधकांचाही उद्धार अशाच प्रकारे करावा’, अशी त्‍यांच्‍या चरणी विनम्र प्रार्थना करून मी त्‍यांच्‍या चरणी हा भावपुष्‍परूपी लेख समर्पित करते.’

– कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक