भाववृद्धी सत्‍संगाच्‍या वेळी फोंडा (गोवा) येथील होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी अनुभवलेले भावक्षण !

१. भाववृद्धी सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्‍लोक म्‍हणत असतांना शब्‍द कानी न पडता केवळ नाद ऐकू येणे आणि नादातून तेजतत्त्व प्रक्षेपित होऊ लागणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘१.७.२०२१ या दिवशी झालेल्‍या भाववृद्धी सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी एक श्‍लोक म्‍हटला. तेव्‍हा त्‍या म्‍हणत असलेले शब्‍द कानी न पडता मला केवळ नाद ऐकू येऊ लागला. त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍यामुळे त्‍यांचे शब्‍द जणू वातावरणात विरून गेले आणि त्‍यांचे रूपांतर नादात झाले. त्‍या नादाचे तरंग माझ्‍या सहस्रारचक्रातून देहात प्रवेश करत असल्‍याचे मला जाणवले. क्षणात माझ्‍यावर आलेले काळ्‍या (त्रासदायक) शक्‍तीचे आवरण नष्‍ट झाले. त्‍या दैवी नादातून वातावरणात पुष्‍कळ तेजतत्त्व प्रक्षेपित होऊ लागले. त्‍यामुळे अल्‍पावधीत वातावरणाची शुद्धी होऊन नादातून चैतन्‍यतरंग प्रक्षेपित होऊ लागले. वातावरण चैतन्‍यमय होऊन पुढील काही क्षणांत त्‍या नादातून पांढर्‍या रंगाचे तुषार वातावरणात कारंज्‍याप्रमाणे प्रक्षेपित होऊ लागले. त्‍या वेळी ‘वातावरणात निर्गुण तत्त्वाचे प्रमाण वाढले आहेे’, असे मला जाणवले.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या चैतन्‍यमय वाणीतील श्‍लोकाचा सर्व साधक अन् वातावरण यांवर होत असलेला परिणाम पाहून कृतज्ञतेने भाव जागृत होणे

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या चैतन्‍यमय वाणीतील श्‍लोकाचा सर्व साधक अन् वातावरण यांवर होत असलेला परिणाम पाहून कृतज्ञतेने माझा भाव जागृत झाला आणि मन शांत झाले. ‘सत्‍संगातील सूत्रे अंतर्मनात जाऊन साधकांकडून सत्‍वर कृती व्‍हावी’, यासाठी ही भगवंताची लीला आहे’, हे जाणून माझ्‍या मनात पुष्‍कळ कृतज्ञता दाटून आली. या आपत्‍काळात धर्मकार्याची गती प्रचंड असल्‍यामुळे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ स्‍वतः भाववृद्धी सत्‍संग घेत आहेत. ‘या अनुभूतीच्‍या माध्‍यमातून भगवंताने मला हे दाखवले’, त्‍याबद्दल कृतज्ञता !

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी दुसरा श्‍लोक म्‍हटल्‍यावर दैवी नाद ऐकू येणे आणि अनाहतचक्राच्‍या ठिकाणी आनंददायी संवेदना जाणवणे 

काही वेळाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी दुसरा श्‍लोक म्‍हटला. त्‍या श्‍लोकातील शब्‍द ऐकू न येता मला केवळ दैवी नाद ऐकू येत होता. त्‍या नादामुळे माझे अनाहतचक्र जागृत होऊन मला तेथे आनंददायी संवेदना जाणवू लागल्‍या. काही क्षणांत तेथे भावाचे वलय कार्यरत झाले. त्‍या वेळी ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या वाणीतील श्‍लोकांचा परिणाम अल्‍पावधीत पुष्‍कळ होत आहे’, याची मला प्रचीती आली.

४. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पुढील श्‍लोक म्‍हटल्‍यावर साधिकेच्‍या मणिपूरचक्राच्‍या ठिकाणी तेजतत्त्व कार्यरत होणे आणि तिच्‍या देहाच्‍या ठिकाणी संपूर्ण सृष्‍टीचे दर्शन होणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पुढील श्‍लोक म्‍हणताच माझ्‍या मणिपूरचक्राच्‍या ठिकाणी तेजतत्त्व कार्यरत होऊन माझे मणिपूरचक्र जागृत झाले. माझ्‍या देहात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. नंतर मला सूक्ष्मातून सागराच्‍या लहरी दिसल्‍या. मला माझ्‍या देहाच्‍या जागी संपूर्ण सृष्‍टीचे दर्शन झाले. ‘या सृष्‍टीतील सागराच्‍या लहरी नृत्‍य करत सूर्यनारायणाला नमस्‍कार करत आहेत’, असे मला जाणवले.

५. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून परात्‍पर गुरुदेवांच्‍या खोलीत जाण्‍याचा भावजागृतीचा प्रयोग घेतल्‍यावर तेथे केवळ प्रकाश दिसणे आणि त्‍या प्रकाशातून गुरुदेव साकार रूपात आल्‍याचे दिसणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘आम्‍ही परात्‍पर गुरुदेवांच्‍या खोलीत गेलो आहोत’, असा भावजागृतीचा प्रयोग करण्‍यास सांगितला. तो प्रयोग करत असतांना परात्‍पर गुरुदेवांच्‍या खोलीत मला केवळ चैतन्‍यच अनुभवायला येत होते. तेथे गुरुदेव दिसत नसून केवळ प्रकाश दिसत होता. त्‍या वेळी मी ‘मला हे चैतन्‍य ग्रहण करता येऊ दे. तुमचे हे तेज मला सहन करता येऊ दे’, अशी प्रार्थना केली. तेव्‍हा त्‍या प्रकाशातून गुरुदेव साकार रूपात आले आणि मी त्‍यांच्‍या चरणांवर नतमस्‍तक झाले.

६. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांच्‍या आवाजातील गुरुदेवांच्‍या संदर्भातील एक गीत लावल्‍यावर त्‍यातील शब्‍द ऐकू न येता पारदर्शक पाण्‍याप्रमाणे आकाशातून पडणारा भावप्रवाह दिसणे 

नंतर महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) आणि सौ. अनघा शशांक जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांच्‍या आवाजातील गुरुदेवांच्‍या संदर्भातील एक गीत सत्‍संगात लावण्‍यात आले. ते ऐकतांना मला त्‍यातील शब्‍द ऐकू येत नव्‍हते. त्‍या वेळी मला पारदर्शक पाण्‍याप्रमाणे आकाशातून पडणारा भावप्रवाह दिसत होता. त्‍या भावप्रवाहात सर्व जण भावस्नान करत परात्‍पर गुरुदेवांना अनुभवत होते. हे दृश्‍य पहातांना मला पुष्‍कळ आनंद होत होता. गायन भावपूर्ण झाल्‍याने मला शब्‍दांपेक्षा त्‍यातून निर्माण होणार्‍या भावाची अनुभूती घेता येत होती.

७. कृतज्ञता

‘हे गुरुराया, तुम्‍ही आम्‍हा सर्वांसाठी किती करत आहात ! कलियुगातील हा भाववृद्धी सत्‍संग म्‍हणजे जणू क्षणोक्षणी गीतोपदेशाप्रमाणे प्रत्‍येक सूत्र आचरणात आणण्‍यासाठी प्रेरणा देणारा अनमोल सत्‍संग आहे. ‘आम्‍हा सर्व साधकांकडून तुम्‍हाला अपेक्षित असे प्रयत्न तुम्‍हीच करून घ्‍या.’ हीच तुमच्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, फोंडा, गोवा. (१.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक