आतंकवादी झुल्‍फिकार बडोदावाला याच्‍याकडून आतंकवाद्यांना बाँबनिर्मितीचे प्रशिक्षण !

देशाला पोखरणारा आतंकवाद समूळ नष्‍ट करण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारने तातडीने पावले उचलावीत !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – कोथरूड पोलिसांनी पकडलेले आतंकवादी महंमद खान, महंमद साकी आणि राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने अटक केलेले आतंकवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्‍याचे समोर आले आहे. १ ऑगस्‍ट या दिवशी राज्‍य आतंकवादविरोधी पथकाने एन्.आय.ए.च्‍या (आर्थर रोड कारागृहातून) कह्यात असलेला आतंकवादी झुल्‍फिकार अली बडोदावाला याला अटक केली आहे. बडोदावाला हा तरुण शस्‍त्र बनवण्‍याचे, तसेच हातबाँब आणि पिस्‍तूल बनवण्‍याचे प्रशिक्षण देत असल्‍याचे अन्‍वेषणातून समोर आले आहे. त्‍यानेच कोथरूडहून पकडलेल्‍या दोघांना सासवड घाटाजवळील जंगलात बाँब बनवण्‍याचे प्रशिक्षण दिल्‍याचे आणि चाचण्‍या केल्‍याची माहिती मिळाली आहे. हा आतंकवाद्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍यांपैकी मुख्‍य संशयित आरोपी होता. त्‍याला ११ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो रतलाम येथील ‘अल सुफा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे.

आतंकवाद्यांचे अंतिम लक्ष्य ‘इसिस’ ! 

वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत बडोदावाला कोंढवा परिसरात रहात होता. त्‍याच कालावधीत तो अटक करण्‍यात आलेल्‍या सर्वांच्‍या संपर्कात आल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाले आहे. आतापर्यंत अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींच्‍या तांत्रिक माहितीच्‍या विश्‍लेषणावरून ते एकमेकांच्‍या संपर्कात असल्‍याचेही निष्‍पन्‍न झाले आहे. गुन्‍ह्याचे अधिक अन्‍वेषण करण्‍यासाठी विशेष सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी बडोदावाला याच्‍या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या सर्वांचे अंतिम लक्ष्य ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणे, हे आहे. त्‍या अनुषंगाने केंद्र आणि राज्‍य पातळीवर सर्व अन्‍वेषण यंत्रणा सतर्क झाल्‍या आहेत.