हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या पुणे येथील प्राध्‍यापकाचे निलंबन ! 

गुन्‍हा नोंद करण्‍यासाठी पोलिसांची टाळाटाळ !

पुणे – येथील ‘सिम्‍बॉयसिस’ महाविद्यालयातील अशोक ढोले या प्राध्‍यापकाने हिंदु धर्मातील देवतांची खिल्ली उडवल्‍याचा ‘व्‍हिडिओ’ समोर आला आहे. महाविद्यालयामध्‍ये शिकवत असतांना त्‍यांनी देवतांचा अपमान केला आहे आणि मुसलमान आणि ख्रिस्‍ती धर्माचे उदात्तीकरण केल्‍याचे समोर आले आहे. ‘मुसलमान आणि ख्रिस्‍ती धर्मात केवळ एकच देव असल्‍याने, बुडणार्‍या नावेतून वाचवण्‍यासाठी त्‍यांचे नाव घेताच ते साहाय्‍यासाठी आले. हिंदू मात्र श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा विविध देवांना साहाय्‍यासाठी बोलावत राहिले; मात्र हिंदु धर्मात असंख्‍य देवता असूनही साहाय्‍यासाठी कुणी आले नाही’, असे म्‍हणत त्‍यांनी हिंदु धर्मातील देवतांची, हिंदूंच्‍या श्रद्धेची खिल्ली उडवली आहे. या घटनेनंतर ‘समस्‍त हिंदु बांधव सामाजिक संस्‍थे’च्‍या कार्यकर्त्‍यांनी प्राध्‍यापकांना डेक्‍कन पोलीस ठाण्‍यात नेले. तिथे पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगून ‘व्‍हिडिओ’ही दाखवला. मात्र १२ घंटे उलटून गेल्‍यानंतरही प्राध्‍यापकावर गुन्‍हा नोंद झाला नाही. या प्रकरणी पोलीस गुन्‍हा नोंद करण्‍यासाठी वेळकाढूपणा करत असल्‍याचा आरोप या संस्‍थेने केला आहे. हे प्रकरण वाढत असल्‍याचे लक्षात येताच संबंधित शिक्षण संस्‍थेने या प्राध्‍यापकाला निलंबित केले आहे. या प्राध्‍यापकाच्‍या निलंबनासाठी ३ ऑगस्‍ट या दिवशी दीड वाजता ‘सिम्‍बॉयसिस’ महाविद्यालयाच्‍या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र निदर्शने केली. त्‍याच्‍यावर खटला प्रविष्‍ट केल्‍याचे समजते.

पोलिसांनी तूर्तास त्‍या प्राध्‍यापकाला सोडून दिले आहे; पण चौकशीअंती योग्‍य ती कारवाई करणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले आहे.

संपादकीय भूमिका

कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवरच गुन्‍हे नोंद करायला हवेत. हिंदू सहिष्‍णू असल्‍यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. देवतांचा अवमान रोखण्‍यासाठी कठोर कायदा करण्‍यासाठी हिंदु लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?