दोडामार्ग – तालुक्यात हत्तींच्या उपद्रवामुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेती, बागायतीसह वित्त हानी झाली आहे. आताही हत्तींकडून हानी चालू असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ९ ऑगस्टपर्यंत हत्तींच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास १० ऑगस्ट या दिवशी सावंतवाडी वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. (गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात अन्यत्रही हत्तींची समस्या आहे. ही समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलने केली. शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे अधिकारी आदींचा समावेश असलेली समितीही स्थापन केली आहे; मात्र त्याचे दृश्य परिणाम अद्याप दिसत नसून हत्तींकडून हानी करणे चालूच आहे. हत्तींचा उपद्रव थांबवू न शकणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ? – संपादक)
तालुक्यातील मोर्ले, केर, घोटगेवाडी, पाळये, सोनावल, तेरवण-मेढे, हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे यांसह पंचक्रोशीत हत्तींचा उपद्रव चालू आहे. शेतकर्यांची शेती, तसेच फळ बागायती हत्तींनी उद्ध्वस्त केली आहे. पूर्वी हत्ती विशिष्ट हंगामात येऊन हानी करून जात असत; मात्र आता हत्ती येथे सातत्याने हानी करत आहेत. या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत काढण्यात आलेली नसून सरकार उपाययोजनांच्या नावाखाली केवळ तुटपुंज्या साधनसामग्रीवर शेतकर्यांची बोळवण करते. सरकारकडून दिली जाणारी हानीभरपाई सुद्धा तुटपुंजी आहे. त्यातून शेती, बागायती यांवर केलेला खर्चही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी १० ऑगस्ट या दिवशी सावंतवाडी येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. याविषयीचे निवेदन ग्रामस्थांनी वन विभागाच्या येथील कार्यालयात दिले आहे.