कल्‍पनाविश्‍व नको, वास्‍तव जाणा !

सध्‍या लहान मुलांचे वाढदिवस त्‍यांचे पालक अगदी थाटामाटात साजरे करतात. अनेकदा त्‍यानिमित्त एखादी सजावटीची संकल्‍पना ठरवली जाते. त्‍या संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने एखादा देखावा उभारला जातो. त्‍या देखाव्‍यासमोर उभे राहून वाढदिवस साजरा करतांनाची छायाचित्रे काढली जातात. अशा एका वाढदिवसाचे छायाचित्र पहाण्‍यात आले. त्‍यात ‘स्‍पायडरमॅन’ची संकल्‍पना सादर करण्‍यात आली होती. देखावा म्‍हणून मागील बाजूला कोळ्‍याच्‍या मोठ्या जाळ्‍याचे चित्र लावण्‍यात आले होते. खरे तर ‘स्‍पायडरमॅन’ हे एका विनोदी मासिकाने प्रकाशित केलेल्‍या चित्रकथांमधील काल्‍पनिक व्‍यक्‍तीमत्त्व आहे. अशा काल्‍पनिक व्‍यक्‍तीमत्त्वाचा देखावा उभारून त्‍या लहानशा जिवाला काय लाभ होणार ? त्‍याच्‍याकडून तो मुलगा काय शिकणार ? मुलांना ‘स्‍पायडरमॅन’, कार्टून किंवा हॅरी पॉटर यांसारख्‍या कल्‍पनाविश्‍वात रममाण करण्‍यापेक्षा जी व्‍यक्‍तीमत्त्वे खरोखर आदर्श आहेत, होती किंवा रहातील, अशांची उदाहरणे त्‍यांच्‍या मनावर बिंबवायला हवीत. वाढदिवसाच्‍या दिवशी काल्‍पनिक व्‍यक्‍तीमत्त्वे पहात मोठी होणारी आजची पिढी भारताचे भवितव्‍य उज्‍ज्‍वल कसे करू शकते ? हीच मुले प्रत्‍यक्ष जीवनात मात्र मग संयम, चिकाटी, स्‍वबळ, आत्‍मविश्‍वास गमावून बसतात अन् क्‍वचित् प्रसंगी आत्‍महत्‍येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. याला उत्तरदायी कोण ? देशाची सद्यःस्‍थिती काय आणि आपण मुलांसमोर आदर्श ठेवतो कुणाचा ? याकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांना कल्‍पनेच्‍या जगात वावरण्‍यास प्रवृत्त करणारे पालक त्‍यांना राष्‍ट्र-धर्माच्‍या संस्‍कारांचे बाळकडू कधी पाजणार ? जिजामातेने हेच बाळकडू दिल्‍याने छत्रपती शिवाजी महाराज घडले, हा आदर्श पालकांनी लक्षात घ्‍यायला हवा.

वाढदिवसानिमित्त सजावटीसाठी निसर्गानुकूल संकल्‍पना ठरवता येईल, म्‍हणजे मुलांमध्‍ये निसर्ग, पर्यावरण यांची ओढ वाढेल. भारताचा इतिहास तेजोमय आहे. त्‍या संदर्भातील संकल्‍पना राबवल्‍यास वाढदिवसानिमित्त येणार्‍या अन्‍य मुलांच्‍याही मनात राष्‍ट्राप्रती प्रेम, आपुलकी निर्माण होईल ! विविध बोधप्रद संकल्‍पनाही साकारता येतील. त्‍यामुळे मुलांमध्‍ये सद़्‍गुणांचा विकास होईल. पालकांनी मुलांना वास्‍तव जीवनातील आनंद घेण्‍यास आणि देण्‍यास शिकवायला हवे. सुसंस्‍कारित आणि आदर्श पिढी हे देशाचे भवितव्‍य असून ती निर्माण करणे हे तुमचे कर्तव्‍य आहे, लक्षात घ्‍या !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.