आतंकवादविरोधी पथकाकडून पुण्यात पाचव्या आतंकवाद्याला अटक !

पुणे – कोथरूड येथून अटक केलेल्या २ आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) १ ऑगस्ट या दिवशी आणखी एका आतंकवाद्याला अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. झुल्फिकार अली बडोदावाला असे अटक केलेल्या पाचव्या आतंकवाद्याचे नाव आहे. तो आतंकवादी कारवाई केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) कोठडीत होता. न्यायालयाची अनुमती घेऊन त्याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. या आतंकवाद्यांचा पसार झालेला साथीदार शहानवाज आलम, तसेच या २ आतंकवाद्यांना ते पसार असलेल्या काळात साहाय्य करणार्‍यांचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथक करीत आहे.

पुण्यात पकडलेल्या आतंकवाद्यांचे इसिस ‘कनेक्शन’?

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) २८ जून २०२३ या दिवशी इसिसच्या सांगण्यानुसार राजस्थानमध्ये आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक केली होती. त्यात झुल्फिकार अली बडोदावाला याचा समावेश होता. याच प्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून नुकतीच अटक केली होती. झुल्फिकार हा अदनान अली याचा मेव्हणा आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले आतंकवादी आणि इसिसचा संबंध असल्याचे पुढे येत आहे.

अल सफामध्ये महिला आतंकवादीही कार्यरत !

अल सफा या आतंकवादी संघटनेच्या सक्रीय असणार्‍या ९ जणांची माहिती ए.टी.एस्.कडे आहे. या प्रकरणी पसार असणार्‍यांचा शोध चालू आहे. या प्रकरणात २ महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यांपैकी देहलीतील जामिया मिलिया इस्लामिया या महाविद्यालयाची विद्यार्थिनी अलिफिया ही अल सफाची सक्रीय महिला आतंकवादी असल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

पुणे हे आतंकवाद्यांचे माहेरघर असल्याचे समोर येत आहे. भारतात आतंकवादाची पाळेमुळे किती खोल रुतली आहेत, हेच यातून स्पष्ट होते !