चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात चिनी सैन्यामध्ये विद्रोहाचे संकेत !

एका सैन्याधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू, तर एक वरिष्ठ अधिकारी आणि परराष्ट्रमंत्री गायब झाल्याचा खळबळजनक घटनाक्रम !

चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या संदर्भात जगभरातील तज्ञांकडून बरेच काही बोलले जात आहे. चिनी सैन्यातील ‘रॉकेट फोर्स’ विभागाचे वरिष्ठ अधिकारी वू गुओहुआ यांचा ६ जून या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यूचे प्रकरण चिनी सैन्याने दाबले आणि मृत्यूमागील खरे कारण उघड होऊ दिले नाही. त्या आधीच ‘रॉकेट फोर्स’चे लेफ्टनेंट जनरल ली यूचाओ हे एकाएकी गायब झाले. या आधी म्हणजे साधारण जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यापासून चीनचे परराष्ट्रमंत्रीही गायब आहेत. हा सर्व घटनाक्रम पहाता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात सैन्यामध्ये वातावरण तापत असल्याचे बोलले जात आहे. एका भारतीय संरक्षणतज्ञाने सांगितले की, हे सर्व पाहून असे वाटते की, चिनी सैन्यामध्ये काहीतरी गौडबंगाल चालू आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी घडत असून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. चिनी नेतृत्वाच्या विरोधात सैन्यामध्ये विद्रोहाचे वातावरण असण्याची दाट शक्यता आहे.

सौजन्य: TV9 Bharatvarsh

१. चीनने वर्ष २०१५ मध्ये त्याच्या धोरणात्मक क्षेपणास्त्र विभागाचे नाव ‘पीएल्ए रॉकेट फोर्स’ असे ठेवले होते. परमाणू क्षेपणास्त्रांचे दायित्वही या विभागाकडे आहे. चीनने वर्ष २०२८ पर्यंत १ सहस्र बनावट क्षेपणास्त्रे बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.

२. चीन सरकारने ली यूचाओ यांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे, असे म्हटले जात आहे. ली यूचाओ यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत असून त्याने चिनी सैन्याची गुपिते अमेरिकेला विकली आहेत, असेही सांगितले जात आहे.

३. चिनी सैन्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘रॉकेट फोर्स’मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे अन्वेषणही चालू आहे.