विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विश्‍व हिंदु परिषदेकडून आयोजित करण्यात येणार्‍या निदर्शनांवर बंदी घालण्याची मागणी फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात उत्तरप्रदेश, हरियाणा आणि देहली सरकार यांना नोटीस बजावून ४ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

१. ज्येष्ठ अधिवक्ता सी.यू. सिंह यांनी निदर्शनांच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांनी म्हटले की, विहिंप आणि बजरंग दल देहलीमध्ये २३ ठिकाणी निदर्शने करणार आहेत. या ठिकाणी चिथावणीखोर भाषणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकर सुनावणी करून निदर्शनांवर बंदी आणावी.

२. यावर न्यायालयाने निदर्शनांवर बंदी घालण्यास नकार दिला; मात्र या निदर्शनांमध्ये चिथावणीखोर विधाने न करण्याचे सांगत या निदर्शनांचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला आहे. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यास सांगितले आहे.