ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर बांधकाम सुरु असताना कोसळलेला पूल

ठाणे – समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे (बांधकामाच्या ठिकाणी अवजड वस्तू उचलण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र) पुलाचे गर्डरचे (खांबांवर असलेला पुलाला जोडणारा क्राँकिट आणि स्टीलचा भाग. हे भाग जोडून पूल होतो) काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले. ३१ जुलैला रात्री ११.३० वाजताच्या कालावधीत ही घटना घडली. कामगारांचे मृतदेह शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून घायाळ कामगारांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

क्रेन आणि गर्डर साधारण २०० फूट इतक्या लांबीचे अवाढव्य असल्यामुळे अन् साधारणतः ते १०० फुटांवरून खाली कोसळल्यामुळे कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने काही कामगार जीवित आढळले असून ७ कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्याकडून बचावकार्य चालू आहे. यासाठी श्‍वानपथकाचे साहाय्य घेण्यात येत आहे. दुर्घटनेच्या वेळी साधारण २५ कामगार काम करत होते. हे कामगार बिहार आणि उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समृद्धी महामार्गावरील हे तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्याचे काम चालू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली सहवेदना !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली असून पीडित कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. ‘पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार असून घायाळ व्यक्तींसाठी ५० सहस्र रुपये इतके आर्थिक साहाय्य केले जाईल’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचा आदेश !

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबियांना राज्यशासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येईल, तसेच घायाळ व्यक्तींवर शासकीय व्ययातून योग्य ते उपचार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे तातडीने दुर्घटनास्थळी गेले असून बचावकार्य चालू आहे. पावसाळा असल्यामुळे काम करतांना काळजी बाळगावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही दुर्घटनेविषयी सहवेदना व्यक्त केली आहे.