पंतप्रधान नरेंद्र मोदी ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !
पुणे – लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशा पालटली होती. टिळकांच्या काळात आणि त्यानंतर जे क्रांतीकारी नेते झाले, त्या प्रत्येकावर टिळक यांची छाप होती. त्यामुळे इंग्रजांनीही टिळकांना ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ (भारतीय असंतोषाचे जनक) म्हटले होते. भारताची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा मागासलेपणाची प्रतीके आहेत, असे इंग्रजांनी म्हटले होते; परंतु लोकमान्य टिळक यांनी ते चुकीचे असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे भारताच्या जनमानसाने टिळकांना ‘लोकमान्यता’ दिली, तसेच ‘लोकमान्य’चा किताबही दिला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अतिशय सन्मानित झालो आहे. pic.twitter.com/k0jSmr18aW
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023
१ ऑगस्ट या दिवशी पुणे येथे लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. लोकमान्य टिळक वापरत असलेले उपरण्याप्रमाणे उपरणे, पुणेरी पगडी, मानचिन्ह आणि १ लाख रुपयांचा धनादेश, असे पुरस्काराचे स्वरूप होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाचा प्रारंभ करून लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. यासमवेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही त्यांनी अभिवादन केले. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे आणि काशी येथे विद्वत्ता चिरंजीव आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चापेकर या विरांची भूमी आहे. या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे या शहरांना विशेष ओळख आहे. पुणे आणि काशी येथे विद्वता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. कोरोनाची लस बनण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान आहे.
Speaking at the Lokmanya Tilak National Award Ceremony in Pune. https://t.co/DOk5yilFkg
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023
भगवद्गीतेतील कर्मयोग लोकमान्य टिळक यांच्यामुळे समजला !
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, या पुरस्कारासाठी टिळकांचे नाव जोडले असल्याने माझे दायित्व कित्येक पटीने वाढले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील १४० कोटी देशवासियांच्या चरणी समर्पित करतो. भगवद्गीतेतील कर्मयोग लोकमान्य टिळक यांच्यामुळे समजला. म. गांधी यांनी लोकमान्य टिळकांना ‘आधुनिक भारताचा निर्माता’ म्हटले होते. इंग्रज म्हणत होते की, भारतवासी देश चालवण्याच्या लायक नाहीत, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सांगितले की, स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्षमता टिळकांनी ओळखली होती. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी साहाय्य केेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे आणि नंतर येथे येऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती.
टिळकांच्या आवाहनानंतर दगडूशेठ हलवाई यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला !नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले, ‘‘पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. दगडूशेठ ही पहिली व्यक्ती होते, जिने लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आणि सार्वजनिकरित्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. मी या पावन भूमीला आणि या भूमीत जन्माला आलेल्या विभूतींना नमन करतो.’’
|
लोकमान्य टिळकांच्या सूत्रांचा अवलंब केल्यामुळे मोदी यांची पुरस्कारासाठी निवड ! – दीपक टिळक, लोकमान्य टिळक यांचे पणतू
लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले. राष्ट्रीयत्व, पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितले होते. ती सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्रात आम्हाला दिसली. त्यातच ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. या कारणास्तव आम्हाला एकच व्यक्ती समोर दिसून आली ती म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला म्हणून आभार मानतो.
इतर मान्यवरांचे मनोगत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगातील लोक महत्त्वाचा नेता म्हणून पहातात, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगून सोहळ्यात त्यांनी मोदी यांच्या कार्याचा पाढा वाचला आणि त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेत ‘केसरी’ नावाचे वृत्तपत्र चालू करून इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल, असे ते म्हणायचे. जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक या दोघांचे योगदान विसरू शकणार नाही.
क्षणचित्रे…
१. नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो’, असे मराठीतून भाषणाला प्रारंभ करताच उपस्थित पुणेकरांनी ‘जय श्रीराम’, ‘मोदी मोदी’ अशा जोरदार घोषणा देऊन आणि टाळ्या वाजवून परिसर दणाणून सोडला.
२. पुरस्काराची १ लाख रुपयांची मिळालेली रक्कम ‘नमामी गंगे योजने’साठी दान देत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी घोषित केले.
३. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर दुतर्फा गर्दी करून जमले होते. मोदी यांचा ताफा जात असतांना त्यांची एक झलक पहाण्यासाठी पुणेकर रस्त्यावर आले होते. हातातील भ्रमणभाषद्वारे पंतप्रधानाची एक झलक टिपण्यासाठी पुणेकर प्रयत्न करत असल्याचे दिसले. बाल्कनीमध्ये उभे राहून महिलांनी मोदी यांना अभिवादन केले.