दाभोळ खाडीतील मासे मृत : प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी केला पंचनामा !

रत्नागिरी – चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली अशा ४ तालुक्यांमध्ये सामावलेल्या दाभोळ खाडीत मागील ३ दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत. या संदर्भात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा करून मृत मासे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी कह्यात घेतले आहेत.

दाभोळ खाडीजवळ असलेल्या भिले, सोनगांव, कोतवली, गोवळकोट, धामणदेवी, मेटे, आयनी, शेरी, गांग्रई, बहिरवली, तुंबाड, शिरसी, शिव, मालदोली, होडखाड, पन्हाळजेसह खाडीलगतच्या अनेक गावांत मृत मासे आढळले आहेत.

दाभोळखाडीवर मासेमारी हेच मासेमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन राहिले आहे. या खाडीत दर्जेदार मासळी मिळत आहे; मात्र ३० जुलैपासून खाडीत मृत मासेही पाण्यावर तरंगतांना ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. ३१ जुलै या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस्.डी. मोरे, क्षेत्र अधिकारी एस्.एन्. शिंदे, केतकीचे सरपंच महेंद्र भुवड, ग्रामसेविका प्रमिला सूर्यवंशी, तलाठी राजेशिर्के, संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे आणि अन्य मान्यवरांनी केतकी येथे यविषयी पंचनामा केला.

मागील ३ दिवसांत रेणवी, कालाडू, पालू, बोय, तांबोशी, खरबा आदी प्रकारची मासळी मृत झाली आहे. हे मासे नेमके कशामुळे मृत झाले ? याचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे.

याविषयी दाभोळ खाडी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर म्हणाले की, २  दिवसांपासून खाडीत मृत मासे आढळत आहेत, हे धक्कादायक आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करून मासेमारांना हानीभरपाई मिळणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका 

घरातील सांडपाणी, कचरा, प्लास्टिक आणि कारखान्यांचे रासायनिक पाणी अशा अनेक कारणांमुळे दाभोळ खाडीतील प्रदूषण वाढलेले असते. या प्रदूषणामुळे खाडीतील माशांच्या अनेक जातीही नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे या समस्येवर प्रदूषणविरोधी कायद्याची कडक कार्यवाही करून संबंधितांना कठोर शिक्षा झाली, तरच या प्रकाराला थोडा तरी आळा बसू शकेल.