कुराण जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी डेन्मार्क उपाययोजना काढणार ! – डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री

लार्स लोके रासमुसेन

कोपेनहेगन (डेन्मार्क) – युरोपीय देश डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी म्हटले आहे की, डेन्मार्कमधील विदेशी दूतावासांसमोर कुराणाचा अवमान होऊ नये, यासाठी कायद्यामध्ये पालट करण्यासाठी सरकारचा अभ्यास चालू आहे. गेल्या मासात रासमुसेन यांनी म्हटले होते की, कुराण जाळणे हे अत्यंत आक्रमक आणि काही व्यक्तींकडून केले जाणारे दु:साहसपूर्ण कृत्य आहे. हे लोक त्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, ज्याच्यावर डॅनिश समाज आधारित आहे.

१. कुराण जाळल्यावरून गेल्या काही आठवड्यांत काढण्यात आलेल्या मोर्च्यांमुळे स्विडन आणि डेन्मार्क यांविषयी जगभर चर्चा चालू होती.

२. ‘अल्-जजीरा’ या वृत्तसंस्थेनुसार स्वीडिश पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी म्हटले की, त्यांनी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांना संपर्क साधून सांगितले की, तेही डेन्मार्कप्रमाणे कुराण जाळण्याच्या घटनांवर आळा घालण्याची प्रक्रिया करत आहेत.

३. जून २०२३ च्या शेवटी स्विडन येथील एका इराणी वंशाच्या ख्रिस्त्याने रितसर अनुमती घेऊन कुराण जाळले होते. तर डेन्मार्क येथील ‘स्ट्रॅम कुर्स’ या कट्टर राष्ट्रनिष्ठ पक्षाचे अध्यक्ष रासमुस पालुदान यांनी जानेवारी २०२३ मध्ये आधी स्विडन आणि नंतर डेन्मार्क येथे कुराण जाळले होते.