‘२९.४.२०२३ या दिवशी संत बाळूमामा देवस्थान, आदमापूर येथील भाकणूक करणारे पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे) कोल्हापूरातील शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आले होते. त्यानंतर ३०.४.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील आश्रमात असणारे सनातनचे साधक श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आले होते. त्यांनी सांगितले, ‘‘ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये पालट झाला आहे.’’ त्यानंतर आम्ही ते चित्र आणि छायाचित्रे पाहिली असता आम्हाला जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. ‘भगवान श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांकडे पाहिल्यावर पुष्कळ चैतन्य जाणवले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्रात सजीवता, पिवळसरपणा आणि ते तेजःपुंज दिसायला लागले. ‘त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या हलत आहेत आणि ते जणूकाही माझ्याकडे पाहून बोलत आहेत’, असे वाटते.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यात अधिक पिवळसरपणा दिसत होता.
४. भगवान श्रीकृष्णाचे चित्र सजीव आणि तेजःपुंज दिसत होते. ध्यानमंदिरातील वातावरण चैतन्यदायी आणि आल्हाददायक वाटत होते.
५. ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मनाची एकाग्रता वाढून मन प्रसन्न आणि निर्विचार होत होते. त्यामुळे ‘मी १ घंटा करत असलेल्या नामजपाचा कालावधी कधी संपतो’, ते कळत नाही. संपूर्ण ध्यानमंदिरात प्रकाश आणि चैतन्य जाणवते.’
– (पू.) सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर (३.५.२०२३)
श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती !
१. ‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ते निर्गुण झाल्यासारखे वाटते आणि श्रीकृष्णाची कांती निळसर वाटते.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून शांतीची अनुभूती येते, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची कांती तेजस्वी झाल्यासारखी वाटते.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून चैतन्य अधिक प्रमाणात पसरल्यासारखे वाटते. ‘त्यांची कांती पिवळसर वाटते आणि त्यांच्या मस्तकावर पिवळसरपणा अधिक आलेला आहे’, असे जाणवते. ‘त्यांच्या छायाचित्रामध्ये अधिक पिवळसरपणा आणि मस्तकावर भंडारा लावला आहे’, असे जाणवते.
४. २९.४.२०२३ या दिवशी संत बाळूमामा देवस्थान, आदमापूर येथे भाकणूक करणारे पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे) यांनी ध्यानमंदिरात येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून प्रार्थना केली आणि प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रावर भंडारा उधळला. त्यानंतर हा पालट जाणवला. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवू लागले.
५. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून निर्गुण तत्त्वाची, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून चैतन्याची आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून शांतीची अनुभूती येते.
६. त्यानंतर सेवाकेंद्रातील ३ साधकांनी हा प्रयोग केल्यावर त्यांनाही तसेच जाणवले.’
– कु. माधुरी दुसे, कोल्हापूर (३.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |