पुरुषोत्तम मास : काय करावे आणि काय करू नये ?

सध्‍या चालू असलेल्‍या अधिक मासाच्‍या (पुरुषोत्तम मासाच्‍या) निमित्ताने…

‘ग्रह मंडलाच्‍या व्‍यवस्‍थेत एका ठराविक कालखंडानंतर १ अधिक मास आल्‍याने ऋतू इत्‍यादींची गणना ठीक चालते. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असल्‍याने दोहोंच्‍या वर्षामध्‍ये ११ दिवसांचे अंतर पडते. पंचांग गणना करण्‍यासाठी सौर आणि चांद्र वर्षांमध्‍ये एकरूपता आणण्‍याकरता प्रत्‍येक तिसर्‍या चांद्र वर्षात १ अतिरिक्‍त चांद्र मास जोडून दोघांचा अवधी समान केला जातो. याच अतिरिक्‍त चांद्र मासाला ‘अधिक मास’, ‘पुरुषोत्तम’ किंवा ‘मल मास’ म्‍हटले जाते.

१. पुरुषोत्तम मास नाव कसे पडले ?

मल मासाने भगवंताला प्रार्थना केली, तेव्‍हा भगवंत म्‍हणाले, ‘‘जा ! मल मास नाही, तर पुरुषोत्तम मास ! या मासात जे माझ्‍या उद्देशाने जप, सत्‍संग, ध्‍यान, पुण्‍य आणि स्नान इत्‍यादी करतील, त्‍यांचे ते सर्व अक्षय्‍य होईल. अंतर्यामी आत्‍म्‍यासाठी जे काही करतील, ते विशेष फलदायी होईल.’’

तेव्‍हापासून मलमासाचे नाव पडले ‘पुरुषोत्तम मास.’ भगवान श्रीकृष्‍ण म्‍हणतात, ‘‘याचा फलदाता, भोक्‍ता आणि अधिष्‍ठाता सर्व काही मी आहे.’’

२. पुरुषोत्तम मासात काय करावे आणि काय करू नये ?

अ. या मासात भूमी शयन (भूमीवर चटई, ब्‍लँकेट किंवा चादर अंथरून), पळसाच्‍या पानाच्‍या पत्रावळीवर भोजन आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणार्‍याची पापनाशिनी ऊर्जा वाढते आणि व्‍यक्‍तिमत्त्वाचा विकास होतो.

आ. आवळा आणि तिळाच्‍या उटण्‍याने स्नान करणार्‍याला पुण्‍य अन् आरोग्‍याची प्राप्‍ती होते.

इ. आवळ्‍याच्‍या वृक्षाखाली भोजन केल्‍याने आरोग्‍य, लाभ आणि प्रसन्‍नता मिळते.

ई. सत्‍कर्म करणे, संयमाने रहाणे इत्‍यादी तप, व्रत आणि उपवास अत्‍यंत लाभदायी आहेत.

उ. घर आणि दुकान यांचे बांधकाम, तसेच तळे, आड आणि विहीर यांचे खोदकाम केले जात नाही.

ऊ. लग्‍न इत्‍यादी सकाम कर्म वर्जित आहेत, तर निष्‍काम कर्म कित्‍येक पट विशेष फळ देतात.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्‍ट २०२०)