सृष्टीच्या निर्मितीपासूनच संपूर्ण जग सनातनमय होते. सत्य आणि धर्म या सृष्टीचे नेत्र होते. अनादी आणि अनंत असे सनातन धर्माधारित सुसंस्कृत अन् अत्यंत संपन्न अशी राष्ट्र व्यवस्था होती. आपल्या पूर्वजांनी या स्थितीचा अनुभव घेतला होता. त्याच भावनेने ‘वसुधैव कुटुम्बकम्’सारखी (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) व्यापकता होती. आमच्या ऋषिमुनींनी ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू), असा उद्घोष केला. गुरु-शिष्य परंपरा त्याचे रक्षण करत आली होती. केवळ ५३ वर्षांपूर्वी ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाने हिंदू गतवैभव विसरले. हिंदूंनी हा अर्थहीन शब्द रक्तात भिनवण्याचे कारण काय ? अन्य धर्मियांनी धर्मनिरपेक्षतेला धुडकावून आपल्या पंथावरील श्रद्धा बलशाली केली. असे असतांना या देशातील हिंदूंनी धर्मनिरपेक्षता का स्वीकारली ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे धर्माचरण करणे, ही गोष्ट दूरची; उलट तेच हिंदू हे धर्माचा अपमान करत आहेत. आज नास्तिकवाद्यांच्या प्रश्नांना हिंदूंना धर्माविषयी उत्तर देता येत नाही; म्हणून आज हिंदु श्रीमंत असून दरिद्री झाले आहेत.
आपले दुर्भाग्य हे की, अशी वैभव संपन्न धर्म-संस्कृती समजून न घेतल्याने आपण आज दरिद्री झालो आहोत, याचा स्वीकार किती हिंदूंनी केला आहे. आपण आपले गतवैभव परत मिळवले पाहिजे, असे किती हिंदूंना वाटते ? अगदी अत्यल्प लोकांना ! ‘धर्म टिकल्यास राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकले, तर आपण टिकू’, हे कटू सत्य जाणून हिंदूंनी अंतर्मुख अन् कृतीप्रवण झाले पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचे सोंग सनातनी हिंदूंना लागू पडणारे नाही. खरा सनातन हिंदु धर्म सोडून दुसर्याची निवड का आणि कशाला करायची ? असा प्रश्न धर्मनिरपेक्ष हिंदूंना विचारावा लागेल.
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक (४.७.२०२३)