कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यापासून तिने राष्ट्रघातकी आणि समाजघातकी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. राज्यात शिवमोग्गा, हुब्बळ्ळी आदी ठिकाणी झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या ‘निष्पाप’ तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली आहे. एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याने दिलेली सूचना म्हणजे आदेशच असतो. त्यामुळे पोलिसांना जो संदेश जायचा आहे, तो गेला आहे. काँग्रेसच्या राज्यात असे धर्मांध समाजात मोकाटपणे फिरले आणि त्यांनी वारंवार दंगली घडवून आणल्या, तर आश्चर्य वाटायला नको. ‘धर्मांध निष्पाप आहेत कि पापी ?’, हे ठरवण्यासाठी भारतात न्यायव्यवस्था आहे. परमेश्वर यांना त्यावर विश्वास नाही का ? परमेश्वर यांनी गृहमंत्रीपद भूषवल्यापासून वेळोवेळी त्यांची राष्ट्रघातकी मनोवृत्ती प्रदर्शित केली आहे. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये काही आतंकवाद्यांना अटक केल्यावर त्यांना ‘आतंकवादी’ संबोधण्यावर परमेश्वर यांनी आक्षेप घेतला होता. ‘त्यांचे अन्वेषण चालू आहे. त्यांच्याकडे स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे अन्वेषणानंतरच सत्य समोर येईल’, असे त्यांचे म्हणणे होते. ‘एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करू नये’, असे परमेश्वर यांना वाटत असेल, तर हाच नियम त्यांनी हिंदूंच्या संदर्भात लावला असता का ? परमेश्वर यांच्यासारखी राष्ट्रघातकी मानसिकतेची व्यक्ती एका राज्याच्या गृहमंत्रीपदावर असेल, तर तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेराच वाजतील. काँग्रेसमधील मंत्री अशाच प्रकारे वागणार असतील, तर कर्नाटक धर्मांध आणि आतंकवादी यांचा अड्डा बनेल. असे झाल्यास, जे काही दशकांपूर्वी काश्मीरमध्ये घडले होते, तेच हिंदूंच्या संदर्भात कर्नाटकात घडू शकते.
मागील काही वर्षांत कर्नाटकातील हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. या राज्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत. सिद्धरामैय्या हे वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्या काळात धर्मांधांनी २४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्याचे म्हटले जाते. या काळात प्रसाद पुजारी, शरद मडीवाळ, मडीकेरी कुटप्पा, दीपक राव अशा हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या होत्या. ही सूची मोठी आहे. सिद्धरामैय्या आता पुन्हा सत्तेवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हिंदुत्वनिष्ठांना जीव मुठीत धरून वावरावे लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. ‘कर्नाटकात मुसलमानांच्या मतांमुळे काँग्रेस निवडून आली’, असे वक्तव्य काँग्रेसच्याच एका मंत्र्याने केले होते. त्यामुळे या समुदायाला खुश करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यांतीलच एक भाग म्हणून काँग्रेसवाल्यांना दंगलखोरांना आरोपमुक्त करायचे आहे. निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक शांतता धोक्यात घालणार्या पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे संतापजनक होय. या सर्व घटना पहाता कर्नाटकातील हिंदूंना प्रदीर्घ लढ्यासाठी सिद्ध रहावे लागणार आहे, हे मात्र निश्चित !