श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेच पुढाकार घ्यावा, असेच बहुतांश हिंदूंचे मत !
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे भारताच्या दौर्यावर येऊन गेले. या वेळी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत श्रीलंकेतील तमिळींचे सूत्र उपस्थित झाले होते. त्यावर नेमके काय बोलणे झाले ? हे समजू शकले नसले, तरी विक्रमसिंघे मायदेशी गेल्यानंतर त्यांच्या सरकारकडून तेथील तमिळींच्या प्रश्नावर आता सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली असून सर्वपक्षांनी यात सहभागी होऊन त्यांची मते मांडावीत आणि या प्रश्नावर एकमत करून कार्य करण्याचे विक्रमसिंघे यांनी आवाहन केले आहे. भारताने श्रीलंकेतील तमिळींविषयी सूत्र उपस्थित करण्याचे आणि त्यानंतर श्रीलंकेच्या सत्ताधार्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कृती करण्याचे ठरवणे, ही गेल्या ३५ वर्षांतील पहिलीच घटना म्हणावी लागेल. काही गोष्टी काळानुसार घडतात, याचेच हे एक उदाहरण आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. वर्ष १९८३ पासून श्रीलंकेच्या उत्तरेकडील तमिळीबहुल जाफना येथून स्वतंत्र तमिळी देशासाठी आंदोलन चालू झाले. पुढे याचे रूपांतर सशस्त्र लढ्यात झाले. ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’ (लिट्टे) या संघटनेच्या माध्यमातून हा लढा चालू झाला होता. याला श्रीलंकेने प्रतिकार करत विरोध चालू केला. वर्ष १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेला साहाय्य करण्यासाठी शांती सेना म्हणून भारतीय सैन्य पाठवले; मात्र याचा विशेष परिणाम झाला नाही. उलट भारतीय सैन्याची हानीच झाली आणि मग ते माघारी बोलवावे लागले. सैन्य पाठवल्याच्या रागातून पुढे लिट्टेने राजीव गांधी यांची हत्या केली. वर्ष २००९ मध्ये लिट्टेचा पूर्ण निःपात करण्यात आला. त्या वेळी काही सहस्र तमिळींना ठार करण्यात आले, तर सहस्र तमिळींनी तमिळनाडूत आश्रय घेतला. या काळात भारताने कधीही तमिळी जे हिंदु आहेत, त्यांची उघड बाजू घेतली नाही कि त्यांचे रक्षण केले नाही. मध्यस्थ म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी, तडजोड करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. आज श्रीलंकेत तमिळी हिंदूंना दुय्यम स्थान आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जातात, मंदिरे पाडली जातात. हे तमिळी हिंदू भारताकडे अपेक्षेने पहात असतात. श्रीलंकेला तमिळींविषयी राग असल्याने तमिळनाडूतील तमिळी मासेमारांवर ते कारवाई करत असतात. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील २ तमिळी मासेमारांना गोळ्या घालून ठारही केले होते. त्या वेळी भारताने विशेष काही केले नव्हते. काही वर्षांत चीनने श्रीलंकेला विकासासाठी साहाय्य करत त्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न चालवला. श्रीलंका आर्थिक दिवाळखोर झाल्यावर चीनने नाही, तर भारताने त्याला साहाय्य केल्याने त्याची स्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. दुसरीकडे केंद्रातील सरकारही आता हिंदुहिताच्या दृष्टीने काही प्रमाणात विचार करणारे असल्यानेच विक्रमसिंघे यांना तमिळी हिंदूंविषयी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यास सांगितले असल्याचेच सर्वपक्षीय बैठकीतून लक्षात येत आहे. या बैठकीतून सकारात्मक गोष्ट निर्माण होऊन तमिळी हिंदूंवरील अत्याचार थांबून त्यांना साहाय्य व्हावे, हीच इच्छा.