जालना, २७ जुलै (वार्ता.) – येथील अंबड पोलीस ठाण्यात सेवारत असणारे पोलीस हवालदार महादु अप्पाराव पवार यांनी तक्रारदारांकडे अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारतांना पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदार पवार यांना कह्यात घेतले असून त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एका प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये, यासाठी तक्रारदार यांनी पवार यांना विनंती केली होती. या वेळी पोलीस हवालदार पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ती देण्याचे मान्य केले. तत्पूर्वी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी करून सापळा रचला. पोलीस हवालदार पवार यांना २ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.