देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. २० जुलै २०२३ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703061.html


५. श्रीकृष्‍णाची भूमिका साकारणारे कलाकार आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती

५ इ. भगवान श्रीकृष्‍णाची भूमिका करण्‍यापूर्वी ईश्‍वराला शरणागतभावाने प्रार्थना करणारे आणि मनातून शांती अनुभवणारे श्री. सौरभ राज जैन !

कु. रेणुका कुलकर्णी

५ इ १. विविध देवतांच्‍या भूमिका साकारणारे श्री. सौरभ राज जैन ! : ‘वर्ष २०१३ मध्‍ये प्रदर्शित झालेल्‍या ‘महाभारत’ या नव्‍या मालिकेत ‘श्री. सौरभ राज जैन यांनी कृष्‍णाची भूमिका उत्तम प्रकारे आणि समरस होऊन केली आहे’, असे वाटते. त्‍यांच्‍यामध्‍ये या दैवी भूमिका करण्‍याचा आध्‍यात्मिक संस्‍कार आणि पाया असल्‍याने कदाचित् त्‍यांना देवतांच्‍या अनेक भूमिका मिळाल्‍या आहेत, उदा. त्‍यांनी ‘देवोंके देव महादेव’ या मालिकेत भगवान श्रीविष्‍णूची भूमिका केली आहे, तर ‘ओम नमो वेंकटेशा’ या तेलुगु भाषेतील चित्रपटात त्‍यांनी श्री बालाजीची भूमिका साकारली आहे. त्‍यांनी ‘महाकाली’ या मालिकेत शिवाचीही भूमिका केली आहे. अशा प्रकारे हरि अन् हर या दोन्‍हींची भूमिका साकारण्‍याचे सौभाग्‍य श्री. जैन यांना लाभले आहे.

५ इ २. ‘श्रीकृष्‍णाची’ भूमिका करतांना केलेली सिद्धता ! : एका मुलाखतीत श्री. सौरभ राज जैन म्‍हणतात, ‘‘श्रीकृष्‍णाच्‍या भूमिकेसाठी मी महाभारत आणि श्रीकृष्‍ण यासंबंधी विविध ग्रंथ वाचले. श्रीकृष्‍णाच्‍या भूमिका करतांना ‘मी काही केलेेच नाही’, असे मला वाटायचे. ‘देवच सर्वकाही करतो’, यावर माझा पूर्ण विश्‍वास असल्‍यामुळे चित्रीकरणापूर्वी मी ईश्‍वराला प्रार्थना करायचो, ‘जे होत आहे, ते तूच करत आहेस; मी काहीही करत नाही.’ यामुळेच मला श्रीकृष्‍णाची भूमिका करता आली.

५ इ ३. ‘श्रीकृष्‍णाची’ भूमिका साकारतांना मनाची शांत स्‍थिती अनुभवणे आणि पूर्वीचा अशांत आणि चिडचिडा स्‍वभाव जाऊन, तो शांत आणि संयमी होणे ! : मला श्रीकृष्‍णाची भूमिका मिळाल्‍यासाठी अजूनही फार कृतज्ञता वाटते. कृष्‍णाची भूमिका करतांना चित्रीकरणाच्‍या वेळी मनाची एक शांत अवस्‍था (Peaceful State) असायची. मी एवढा शांत नव्‍हतो; मात्र कृष्‍णाच्‍या भूमिकेमुळे मी शांत आणि अंतर्मुख झालो. पूर्वी काही अप्रिय घटना घडली, तर मी अधिक कालावधीसाठी भावनाशील व्‍हायचो आणि चिडचिड करायचो. आता कधी कठीण परिस्‍थिती निर्माण झाली, तरी मी पूर्वीप्रमाणे अधिक कालावधीसाठी भावनाशील होत नाही. मला त्‍यातून लगेच बाहेर येता येते. माझ्‍यातील हे परिवर्तन श्रीकृष्‍णाच्‍या भूमिकेमुळेच झाले आहे.

५ इ ४. शिकण्‍यासाठी ‘महाभारत’ मालिकेचे जुने भाग पहाणे आणि श्रीकृष्‍णाच्‍या भूमिकेतील काही वाक्‍ये सतत स्‍मरून प्रोत्‍साहन मिळणे : श्रीकृष्‍णाची भूमिका करतांना मी पुष्‍कळ काही शिकलो. सध्‍या मी ‘महाभारत’ मालिकेचे जुने भाग पुन्‍हा पहात आहे. त्‍यातून मला नवनवीन शिकायला मिळत आहे. ‘श्रीकृष्‍णा’च्‍या भूमिकेतून मी अजूनही शिकत आहे. श्रीकृष्‍णाच्‍या भूमिकेमुळे माझी जीवनशैली आणि जीवनाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोनच पालटला. श्रीकृष्‍णाच्‍या भूमिकेतील काही वाक्‍ये मला अजूनही आठवतात आणि ती मला प्रोत्‍साहित करतात, ‘स्‍वतःची अन्‍यांच्‍या समवेत तुलना न करता नेहमी स्‍वतःशीच तुलना करा आणि श्रेष्‍ठ बनण्‍यापेक्षा, उत्तम बना !’ ही वाक्‍ये मी स्‍वतःला सतत बजावत रहातो. याच समवेत ‘करुणा ही धर्म है ।’ (करुणा हाच धर्म आहे) या वाक्‍यानेही मला पुष्‍कळ काही शिकवले.

कु. म्रिण्‍मयी केळशीकर

५ इ ५. ‘जेथे अहंकार असतो, तेथे ईश्‍वर नसतो’, त्‍यामुळे अहं त्‍यागून मनात देवाला स्‍थान देणे महत्त्वाचे असणे : लहानपणी शाळेत असतांना मला एक दोहा फार आवडायचा,

‘स्‍वयं विधाता हो, हे मानव, अंतर में विश्‍वास जगाओ ।
चलो न मिटते पदचिह्नों पर, अपने रस्‍ते आप बनाओ । अपनी
आत्‍मज्‍योति से पुलकित, अपने सुर(देव) स्‍वयं बन जाओ ॥’

अर्थ : ‘हे मानवा, तू स्‍वतःचा विधाता हो, तुझ्‍या अंतरात तसा विश्‍वास जागव. पुसल्‍या न जाणार्‍या पाऊल खुणांवरून चालत रहा आणि स्‍वतःचा मार्ग स्‍वतःच शोध. स्‍वतःतील आत्‍मज्‍योतीने प्रकाशमान होऊन स्‍वतःचे सुर(देव) स्‍वतःच बन.’

यातील ‘अपने सुर स्‍वयं बन जाओ’ याचा अर्थ ‘स्‍वतःच स्‍वतःचा देव व्‍हायचे, म्‍हणजे मनाप्रमाणे करायचे’, असे नाही !’ असे बोलल्‍याने तेथे अहंकार येतो आणि जेथे अहंकार असतो, तेथे ईश्‍वर कधीही नसतो. एकतर अहं असेल किंवा ईश्‍वर असेल. त्‍यामुळे आपण अहं त्‍यागून स्‍वतःच्‍या मनात देवाला स्‍थान दिले पाहिजे. हेच मी सध्‍या आचरणात आणत आहे.

५ इ ६. ‘आयुष्‍यात कितीही संकटे आली, तरी आपण स्‍मितहास्‍य करून ते संकट पार करू शकतो !’ हे श्रीकृष्‍णाच्‍या स्‍मितहास्‍यातून शिकायला मिळणे : मला नेहमी प्रश्‍न पडायचा, ‘भगवान श्रीकृष्‍ण नेहमी स्‍मितहास्‍य का करतो ?’ याविषयी मी अनेकांना विचारले. एकाने मला याचे मजेशीर कारण सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘या स्‍मितहास्‍यातून श्रीकृष्‍ण सांगतो, ‘तुला जे करायचे आहे, ते तू करत रहा; पण शेवटी माझ्‍या मनात आहे, तेच होणार आहे !’ त्‍यामुळे तो सदैव स्‍मितहास्‍य करतो.’’

एकदा श्रीकृष्‍णाचा अभिनय करतांना मला वाटले, ‘श्रीकृष्‍णाला त्‍याच्‍या स्‍मितहास्‍यातून काहीतरी शिकवायचे आहे.’ तेव्‍हा लगेच मनात त्‍याचे उत्तर आले, ‘आयुष्‍यात कितीही संकटे आली, तरी आपण स्‍मितहास्‍य करून ते संकट पार करू शकतो !’

५ इ ७. चित्रीकरणाच्‍या वेळी बदकांच्‍या आवाजामुळे चित्रीकरणात व्‍यत्‍यय येणे, काही दिवसांनी आतूनच ‘आता बदके ओरडणार आहेत’, अशी जाणीव झाल्‍यावर संवाद न म्‍हणणे आणि प्रत्‍यक्षात तेव्‍हाच बदकांनी ओरडणे : चित्रीकरणाच्‍या वेळी वैकुंठातील दिव्‍य वातावरण दाखवण्‍यासाठी बदके, ससे इत्‍यादी प्राणी आणले जाऊन त्‍यांना ध्‍वनीचित्रीकरण कक्षातील कृत्रिम तलाव किंवा हिरवळ येथे सोडले जायचे. जेव्‍हा दिग्‍दर्शक ‘अभिनय (अ‍ॅक्‍शन) करा ’, असे म्‍हणत, तेव्‍हाच नेमकी सर्व बदके ‘क्‍वॅक, क्‍वॅक’ आवाज करून ओरडायला लागत. त्‍यामुळे चित्रीकरण थांबवावे लागे. असे अनेकदा झाल्‍याने चित्रीकरणाला उशीर होऊ लागला. काही दिवसांनी मला आतून ‘आता बदके ओरडणार आहेत !’, अशी जाणीव व्‍हायची. त्‍यामुळे मी संवाद म्‍हणायचेे थांबायचो. बदकांचे ओरडून झाल्‍यावर शांतपणे माझे संवाद म्‍हणायचो. त्‍यामुळे चित्रीकरण न थांबता चालू राहिले आणि वेळेत पूर्ण झाले. मला आलेली ही चांगली अनुभूती माझ्‍या अजूनही स्‍मरणात आहे.’

(समाप्‍त)

श्री. सौरभ राज जैन यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे 

‘श्री. सौरभ हे जैन पंथीय असल्‍याने त्‍यांना भगवान श्रीकृष्‍णाविषयी विशेष ठाऊक नव्‍हते. श्रीकृष्‍णाची भूमिका साकारण्‍यासाठी त्‍यांनी विविध ग्रंथांचे अध्‍ययन केले. श्रीकृष्‍णाच्‍या अभिनयातून मिळणारा आनंद त्‍यांच्‍या चेहर्‍यावर दिसतो. त्‍यांची भूमिका पहातांना पुष्‍कळ हलके वाटते. त्‍यांचा अभिनय बघून भाव जागृत होतो. त्‍यांच्‍यात शरणागती आणि कृतज्ञतेचा भाव दिसतो. त्‍यांच्‍यात अनेक गुण असून त्‍यांची अध्‍यात्‍मात प्रगती करण्‍याची क्षमता आहे’, असे जाणवते.’

– कु. रेणुका कुलकर्णी आणि कु. म्रिण्‍मयी केळशीकर