मुख्यमंत्र्यांनी अन्वेषणाचा निर्णय घ्यावा ! – वीजमंत्री ढवळीकर, गोवा

  • गोवा विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचा आरोप

  • वर्ष २०१६ मध्ये ‘बंच केबलिंग’चा १४५ कोटी रुपयांचा घोटाळा !

‘बंच केबलिंग’चा घोटाळा !

पणजी, २५ जुलै (वार्ता.) – वीज खात्यात वर्ष २०१६ मध्ये राबवलेला १४५ कोटी रुपये खर्चाचा ‘एरियल बंच केबलिंग’ हा प्रकल्प निरुपयोगी ठरलेला आहे. या प्रकल्पाचे अन्वेषण करण्यास मी सिद्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत केले.

राज्यात वारंवार होणार्‍या खंडित वीजपुरवठ्यावरील लक्षवेधी सूचनेच्या वेळी मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. ‘गोवा फॉरवर्ड’चे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे हळदोणाचे आमदार तथा अधिवक्ता कार्लुस फेरेरा आणि भाजपचे सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

(सौजन्य : Goa News Hub)

वीज खात्यात ‘एरियल बंच केबलिंग’चा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो, भाजपचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. आमदार मायकल लोबो म्हणाले, ‘‘गत विधानसभा अधिवेशनात या घोटाळ्याचे अन्वेषण करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी मला दिले होते; मात्र अद्यापही या घोटाळ्याचे अन्वेषण झालेले नाही. या प्रकरणी अन्वेषणासाठी सभागृह समिती स्थापन करावी.’’

आमदार संकल्प आमोणकर आणि विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी ‘या घोटाळ्याला कोणता मंत्री आणि अभियंता उत्तरदायी आहे’, हे सध्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घोषित करावे.

(सौजन्य : Prudent Media Goa)

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘तत्कालीन वीजमंत्री सध्या या विधानसभेचे सदस्य नसल्याने मी त्यांचे नाव आता घेऊ शकत नाही; मात्र या घोटाळ्याचे अन्वेषण करायचे असल्यास त्यासाठी मी सिद्ध आहे.’’