मुंबईत मॅनहोल्‍सवरील चोर्‍यांची स्‍थिती गंभीर, प्रतिवर्षी ६३२ मॅनहोल्‍सच्‍या झाकणांची होते चोरी !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – मुंबईमध्‍ये प्रत्‍येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्‍सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्‍सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्‍यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्‍नांवर लिखीत स्‍वरूपात दिली आहे. मॅनहोल्‍समध्‍ये पडून मागील काही वर्षांत मुंबईमध्‍ये काही नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. यातून मुंबईतील मॅनहोल्‍सवरील झाकणांच्‍या चोर्‍यांची गंभीर स्‍थिती पहाता सरकारने या चोर्‍यांकडे गांभीर्याने पहाणे आवश्‍यक आहे. मुंबईमध्‍ये मलनि:सारण वाहिन्‍यांवर एकूण ७४ सहस्र ६८२ मॅनहोल्‍स आहेत, तर पर्जन्‍य जलवाहिन्‍यांवर २५ सहस्र ५९३ मॅनहोल्‍स आहेत, असे तारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तरात म्‍हटले आहे. आमदार पराग शाह यांनी विधानसभेत याविषयीचा तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

मॅनहोल्‍सच्‍या झाकणांची चोरी रोखण्‍यासाठी मुंबईमध्‍ये ‘स्‍मॉर्ट मॅनहोल्‍स’ ही संकल्‍पना राबवण्‍यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत १४ ठिकाणी ‘स्‍मार्ट मॅनहोल्‍स’ बसवण्‍यात येणार आहेत.