संपादकीय
राज्यात ‘ऑनलाईन गॅम्बलिंग’ (जुगार) होत असल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै या दिवशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत दिले. याचसमवेत जे ‘गेम ऑफ स्किल’ म्हणजे जे कौशल्याचे खेळ असतात, त्यांना मात्र कायद्यानुसार अनुमती असल्याने ते तसेच चालू राहू शकतात, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ‘अवैध खेळांमध्ये पोलीस अधिकार्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू’, असे ते म्हणाले.
ऑनलाईन रमी : एक प्रतिष्ठित जुगार !
आतापर्यंत जुगार किंवा ‘अवैध धंदे’ असे आपण ऐकत होतो. आता कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी वैध करून घेतलेले आणि वरकरणी खेळ म्हणून ‘ऑनलाईन’चे लेबल लावून खेळले जाणारे कित्येक खेळ, हे खरेतर एकप्रकारचे जुगारच आहेत. कुठल्याही खेळासाठी कौशल्य हे लागतेच; मग तो मनोरंजनाच्या हेतूने खेळला जाणारा असूदे, नाही तर जुगाराच्या हेतूने; परंतु जुगारात इतरांना पैसे लावायला लावून आणि खेळणार्याला हारवून मालक मात्र कोट्यवधी रुपये कमवत असतो; म्हणून या कौशल्याचा हेतू शुद्ध नसल्याने तो जुगार होतो आणि तो अनैतिक आहे. सध्या ‘ऑनलाईन रमी’ या नावाने जळी-स्थळी विज्ञापने करून प्रचंड प्रमाणात जुगाराचा जो बाजार मांडला गेला आहे, तो शासन-प्रशासनासह सर्व जागरूक नागरिकही उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. जसे गोव्यात ‘कॅसिनो’सारखे जुगाराचे खेळ प्रतिष्ठित करून त्यांना अधिकृत स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे, तसेच कौशल्याच्या नावाखाली कायद्याच्या अंतर्गत बसवता येणारे कित्येक ‘ऑनलाईन’ खेळ हे प्रत्यक्षात जुगारच असूनही त्याला अधिकृत केले गेल्याने प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘ऑनलाईन’ कॅरम, ल्युडो, रमी या सार्या खेळांत पैसे लावले जातात. पूर्वी लहान मुले ल्युडोसारखे खेळ खेळायची, त्यात एक प्रकारची गंमत आणि निरागसता असायची. आता या ‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली जुगाराचे एक राक्षसी स्वरूप समोर आले आहे.
कलाकारांची सामाजिक बांधीलकी
एकेकाळी श्रीकृष्णाची भूमिका साकारलेले मराठीतील एक आघाडीचे कलाकार हे ‘ऑनलाईन रमी’चे विज्ञापन करतात, तर गुटख्याचे विज्ञापन करणारे अन्य एक प्रसिद्ध कलाकारही हे विज्ञापन करतात. काही कलाकार मात्र समाजाला हानीकारक उत्पादनांची विज्ञापने करणे नाकारतात. ‘फेअर अँड लव्हली’, उंची वाढणार्या पावडरी, हानीकारक कोल्ड-ड्रिंक्स आदींची विज्ञापने काही कलाकारांनी नाकारली आहेत. तर काही कलाकार सर्रास गुटखा, मद्य, जुगारी खेळ यांची विज्ञापने करत असतात. ‘जो समाज त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देतो, त्यांचेच जीवन उद़्ध्वस्त करण्यासाठी हे त्यांना भरीला घालतात’, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे खाल्ल्या मिठाला जागणे नक्कीच नव्हे.
‘ऑनलाईन गेम’मुळे होणारी हानी
‘ऑनलाईन गेम’च्या तीन पत्ती, रमी, तसेच कॅसिनो अशा खेळांमध्ये पैसे लावल्यास दिवसाला लाखो रुपयांचा लाभ करून देण्याचे आमीष दाखवून गोंदियातील जैन नावाच्या एका व्यक्तीने नुकतीच त्याच्या कौटुंबिक संबंध असलेल्या स्वतःच्या व्यापारी मित्राचीच ५८ कोटी रुपयांची फसवणूक केली आणि तो आता पसार झाला आहे. हा आरोपी बनावट ‘अॅप’ सिद्ध करून आणि त्यावरून ‘लिंक’ पाठवत होता. ‘ऑनलाईन गेम’मध्ये फसवणारे प्रारंभी समोरच्याला जिंकून देतात, तसेच येथेही झाले.
‘ऑनलाईन गेम’ हे भारित केल्याप्रमाणे सतत तुम्हाला खेळायला भाग पाडतात. त्याचा मन, बुद्धी, शरीर यांवर गंभीर परिणाम होऊन मुले मानसिक आणि शारीरिक आजाराने त्रस्त झाली आहेत. काही निराशाग्रस्त, तर काही आत्महत्येस प्रवृत्त झाली आहेत. पूर्वी ‘खेळ केवळ मुलेच खेळतात’, हे आपल्याला ठाऊक होते. आता भ्रमणभाषमुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील स्त्री-पुरुष हे खेळ खेळून त्यांचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. ही एक प्रकारची मोठी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय हानी आहे. आज देश विविध प्रश्नांनी पेटलेला असतांना अनेक जण मात्र त्यांच्या भ्रमणभाषच्या खेळांमध्ये बेधुंद झाल्याप्रमाणे आणि जगाशी काही देणे-घेणे नसल्याप्रमाणे गुंग असतात. हे कशाचे लक्षण आहे ? ‘पबजी’ खेळामुळे होणारी हानी लक्षात घेऊन त्यावर बंदी घालण्यात आली. क्रिकेट सट्टा आपण अनधिकृत मानतो आणि त्यातील गुन्हेगारांना सट्टेबाज म्हणून पकडले जाते; परंतु पैसे मिळवून देणारे ‘ड्रीम ११’ आणि यांसारखे क्रिकेटशी संबंधित अनेक ‘ऑनलाईन गेम’ हा एक प्रकारचा अधिकृत करून घेतलेला सट्टा किंवा जुगारच नव्हे काय ? काही ‘ऑनलाईन गेम’मध्ये ‘चॅट करणे’, ‘व्हिडिओ पाठवणे’ आदी गोष्टी उपलब्ध असतात. त्यातून अयोग्य गोष्टींना मोठ्या प्रमाणात थारा मिळतो. ते व्हिडिओ पहाण्यासाठीही खेळ खेळले जातात. खेळाच्या माध्यमातून मुलींना फसवले जाते, त्यांचे आयुष्य उद़्ध्वस्त होते. हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकारही ‘ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून चालू आहेत.
‘ऑनलाईन गेम’वरील वस्तू आणि सेवा कर १८ वरून २८ टक्के केल्याने महसुलात तब्बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्हा एक हरतो, तेव्हाच दुसरा जिंकतो. यामध्ये हरणारे प्रसंगी आयुष्यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
समाजाला जुगारी बनवणार्या ‘ऑनलाईन गेम’विषयीचे धोरण शासन पालटेल का ? |