१. ब्रह्मोत्सवात सहभागी झालेल्या साधिकांना नऊवारी साडी नेसवण्याची सेवा करतांना तहान-भूक विसरणे आणि ‘साधिका टाळनृत्य करत असतांना त्यांच्या समवेत टाळनृत्य करत आहे’, असे वाटणे
‘११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सवात सहभागी झालेल्या साधिकांना नऊवारी साडी नेसवण्याची सेवा करतांना देवाच्याच कृपेमुळे मी तहान-भूक विसरले होते. मैदानात जेव्हा रथापुढे साधिका टाळनृत्य करत होत्या, तेव्हा ‘मीही त्यांच्या समवेत टाळनृत्य करत आहे’, असे मला वाटत होते आणि ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ।’ ही ओळ मला आठवत होती. सकाळपासूनच मला पुष्कळ आनंद वाटत होता.
२. रथामध्ये प्रत्यक्ष गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना बघून आनंदाला पारावार न उरणे
रथामध्ये प्रत्यक्ष गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना बघून माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. ‘देवाने आपल्यावर किती कृपा करावी’, असे वाटून डोळे सारखे भरून येत होते. ते दृश्य बघतांना देवाला एकच प्रार्थना होत होती. ‘गुरुमाऊली, मी तर सगळ्याच गोष्टीत असमर्थ आहे. तूच माझ्या हृदयात अखंड वास कर. ‘तुजविण नाही दुजा आधार, करण्या भवसागर हा पार ।’
– सौ. सुचेता नाईक, फोंडा, गोवा, (१७.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |