पुणे येथील पी.एम्.पी.एम्.एल्.च्‍या ३६ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई; ३ बडतर्फ !

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पी.एम.पी.एम्.एल्.) अध्‍यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी नुकताच पदभार घेतला आहे. प्रवाशांना प्रवासाभिमुख सेवा मिळावी, अधिकाधिक बस मार्गांवर संचलनात असाव्‍यात, कामात शिस्‍त लागावी म्‍हणून त्‍यांनी काही डेपोंना अचानक भेट दिली. तेव्‍हा अनेक दिवसांपासून कामावर अनुपस्‍थित रहाणार्‍या ३६ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली. त्‍यामध्‍ये ३० वाहक, तर ६ चालक यांचा समावेश आहे. तसेच ३ कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे आणि १४२ कर्मचार्‍यांवर आरोपपत्र प्रविष्‍ट केले आहे. अध्‍यक्षांनी केलेल्‍या कारवाईमुळे अनेक वाहक आणि चालक यांचे धाबे दणाणले आहे. पी.एम्.पी.एम्.एल्.च्‍या १५ डेपोंमधील अनेक कर्मचारी सतत अचानक सुटी घेणे, अनेक दिवस कामावर न येणे असे दिसून आले. कर्तव्‍यात कसूर करणार्‍यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्‍यात येत आहे.

पी.एम्.पी.एम्.एल्. मधील विविध विभाग प्रमुखांना एक डेपो दत्तक दिला आहे. त्‍या ठिकाणी प्रत्‍येक शनिवारी पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेत उपस्‍थित राहून प्रवाशांना सेवा चांगली मिळते का ? हे पहाण्‍याचेही आदेश दिले आहेत. २२ जुलै या दिवशी केलेल्‍या पहाणीत विविध डेपोंतील ७८ वाहक आणि ६४ चालक उपस्‍थित नसल्‍याचे दिसून आले. त्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.