‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी बंद पाळत काढला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

बेडग (जिल्‍हा सांगली) येथील कमानीचे खांब पाडल्‍याचे प्रकरण !

‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला भव्‍य मोर्चा

सांगली – सांगली जिल्‍ह्यातील मिरज तालुक्‍यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाने उभारल्‍या जात असलेल्‍या कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. ही कारवाई एकतर्फी असून ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी २४ जुलैला बंद पाळत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढला. नोंद झालेले गुन्‍हे मागे न घेतल्‍यास गावे बेमुदत बंद ठेवण्‍यात येतील, अशीही चेतावणी या प्रसंगी देण्‍यात आली.

कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी गाव सोडून निघालेल्‍या मागासवर्गीय बांधवांच्‍या आंदोलनानंतर उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. या आंदोलकांना देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकारी व्‍ययातून कमान बांधून देऊ, तसेच या प्रकरणी दोषी असणार्‍या ग्रामपंचायत अधिकारी-पदाधिकारी यांंवर गुन्‍हे नोंद करू’, असे आश्‍वासन दिले होते. यानंतर सरपंच, उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्‍यामध्‍ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे नोंद झाले आहेत.