देवाविषयी दृढ श्रद्धा आणि सूक्ष्मातून कळण्याची क्षमता असलेला पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

पुरुषोत्तम मासाच्‍या मंगल प्रारंभ दिनी, संतमुखे वदली सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची वाणी, शांत, समंजस अन् वसे निरंतर भाव ज्‍याच्‍या मनी, असा अर्जुन मुक्‍त झाला भव-बंधनातूनी ।
कु. अर्जुन गुळवे याचा सत्‍कार करतांना पू. (सौ.) मनीषा पाठक

पुणे, (वार्ता.) – अधिक श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१८ जुलै २०२३) या दिवशी सातारा रस्‍ता (पुणे) येथील बालसाधक कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी प्राप्‍त केल्‍याचे घोषित करण्‍यात आले. सनातनच्‍या १२३ व्या समष्टी संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी कु. अर्जुन याचा भेटवस्तू आणि खाऊ देऊन सत्कार केला.

या वेळी कु. अर्जुन याचे वडील श्री. सचिन गुळवे, आई सौ. रसिका गुळवे, आजी (वडिलांच्‍या आई) श्रीमती सुवर्णा गुळवे, सौ. संगीता लोखंडे (आत्‍या), ६७ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी च्या साधिका सौ. अनुराधा तागडे आणि अन्य साधक उपस्थित होते. तसेच फोंडा, गोवा येथील सौ. लतिका पैलवान (कु. अर्जुनची आजी (आईची आई), आध्‍यात्‍मिक पातळी ६२ टक्‍के ), सुश्री (कु.) अश्‍विनी पैलवान (अर्जुनची मावशी ) आध्‍यात्‍मिक पातळी ६२ टक्‍के ) आणि श्री. अमित पैलवान (अर्जुनचे मामा) हे हि या सोहळ्यात ‘ऑनलाईन’  सहभागी झाले होते.

आध्‍यत्‍मिक प्रगती होणे, ही श्री गुरूंची साधक जीवावर असणारी कृपादृष्‍टीच ! – पू. (सौ.) मनीषा पाठक

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. जयंत आठवले यांची कृपादृष्‍टी केवळ साधकच नाही, तर सनातनशी जोडलेल्‍या प्रत्‍येक जिवावर आहे. गुरूंची कृपा अनंत प्रकारे होत असते. आध्‍यत्‍मिक प्रगती होणे, ही श्री गुरूंची साधक जीवावर असणारी कृपादृष्‍टीच होय. विविध अनुभूतींच्‍या माध्‍यमातून साधक ती कृपा अनुभवत असतो.  सनातनच्‍या साधिका सौ. रसिका गुळवे आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांनी कु. अर्जुन याच्‍यावर लहानपणापासून चांगले संस्‍कार केले. अर्जुनमध्‍ये भाव असून त्‍याचे साधनेचे प्रयत्न त्‍याला जितके शक्‍य आहेत, तसे तो चांगले करत आहे. त्‍याच्‍यामध्‍ये अनेक दैवी गुणही आहेत. अर्जुनमध्‍ये असलेले उपजत दैवी गुण, साधनेचे प्रयत्न, चांगले संस्‍कार यांमुळे गुळवे कुटुंबियांवर गुरुदेवांची कृपा झाली असून अर्जुन याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली आहे, असे पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी अर्जुन याच्‍या आध्‍यत्‍मिक प्रगतीचे गुपित उलगडतांना सांगितले.

अर्जुनची आध्‍यामिक प्रगती झाल्‍याचे ऐकून माझे जीवन कृतार्थ झाले ! – सौ. रसिका गुळवे (अर्जुनची आई)

सौ. रसिका गुळवे

गुरुदेवांच्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. आनंदवार्ता ऐकली, तेव्‍हा क्षणभर काही सुचलेच नाही. अर्जुनच्‍या आध्‍यत्‍मिक प्रगतीची आनंदवार्ता ऐकून जीवनाचे सार्थक झाल्‍याचे वाटले. गुरुदेवांनी आम्‍हा पामरांवर केलेल्‍या या कृपावर्षावासाठी कृतार्थ आहे. गुरुदेवा, आम्‍हा सेवकांकडून आमच्‍या शेवटच्‍या श्‍वासापर्यंत अविरतपणे आपल्‍या चरणांची सेवा घडू दे, ही आपल्‍या चरणी प्रार्थना आहे, असे भावपूर्ण मनोगत सौ. रसिका गुळवे (कु. अर्जुन याची आई) यांनी व्‍यक्‍त केले.

आतापर्यंत वाढवलेल्‍या सर्व मुलांमध्‍ये अर्जुनचे वेगळेपण नेहमीच जाणवले ! – श्रीमती सुवर्णा गुळवे (अर्जुनची आजी (वडिलांची आई)

एकत्र कुटुंबपद्धती असल्‍यामुळे २०-२५ मुले माझ्‍या हाताखाली राहिली – वाढली असतील. या सर्वांमध्‍ये अर्जुनचे वेगळेपण तो लहान असल्‍यापासून जाणवायचे. अर्जुनचा जन्‍म होण्‍याआधी कित्‍येक वर्षांपूर्वी मी सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सेवा करत होते; परंतु एकत्र कुटुंबपद्धती आणि कौटुंबिक विरोध यांमुळे मला अधिक काळ सेवा करता आली नाही. माझ्‍या मुलाचा (श्री. सचिन गुळवे यांचा) विवाह झाल्‍यानंतर सुनेमुळे (सौ. रसिका यांच्‍यामुळे ) पुन्‍हा एकदा सनातन संस्‍थेशी अधिक जोडले गेले. तेव्‍हापासून अनेक अनुभूतीही आल्‍या. कु. अर्जुन हा लहानपणापासूनच शांत आणि समजूतदार आहे. अन्‍य मुलांसारखे कुणाच्‍या खोड्या काढणे किंवा भांडण करणे, त्रास देणे अशा गोष्‍टी त्‍याने केल्‍या नाहीत. लहान असल्‍यापासूनच ‘कोणत्‍या प्रसंगात योग्‍य काय करायला हवे’, याची त्‍याला समज आहे, हे विविध प्रसंगांतून आम्‍हाला लक्षात यायचे.

स्‍वतःच्‍या सत्‍कार सोहळ्‍याच्‍या वेळी सहज आणि स्‍थिर भावात असलेला कु. अर्जुन !

स्‍वतःची आध्‍यत्‍मिक प्रगती झाल्‍याचे ऐकल्‍यावर अर्जुन स्‍थिर भावात होता. आध्‍यात्मिक पातळी घोषित होण्‍याआधीचे आणि स्‍तर घोषित झाल्‍यानंतरचे त्‍याचे वागणे, वावरणे हे सारखेच होते. त्‍यात सहजता होती. त्‍याची अंतर्मनातून साधना चालू असून तो बाह्य दृष्‍टीने सर्व पहात असला तरी आतून त्‍याने ईश्‍वराशी सूक्ष्म अनुसंधान साधले आहे, त्‍याच्‍यात अहं अल्‍प आहे, असे त्‍याच्‍याकडे पाहिले तेव्‍हा मला जाणवले. पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे सोहळ्‍यातील बोलणे तो लक्षपूर्वक ऐकत होता. सोहळा त्‍याच्‍याविषयी असूनही कार्यक्रम स्‍थळी त्‍याचे अस्‍तित्‍व अतिशय अल्‍प जाणवून त्‍याऐवजी ईश्‍वरी चैतन्‍य अधिक जाणवत होते. त्‍यामुळे सोहळ्‍यात आनंद जाणवणे, भावजागृती होणे, सोहळ्‍याच्‍या प्रारंभी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सूक्ष्मातून आगमन झाल्‍याचे जाणवून त्‍यांचे सतत अस्‍तित्‍व जाणवणे, अशा अनुभूती आल्‍या. – सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे.


कु. अर्जुन सचिन गुळवे याची त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे !

कु. अर्जुन सचिन गुळवे याच्‍याविषयी त्‍याची आई, आजी (आईची आई) आणि मावशी यांना जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. लतिका पैलवान

१. वय जन्‍म ते ३ वर्षे

१ अ. ‘कु. अर्जुन ६ मासांचा होईपर्यंत त्‍याच्‍या दोन्‍ही हातांची सतत ज्ञानमुद्रा आसायची.

१ आ. देवाची ओढ

१. तो रडत असतांना प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने म्‍हटल्‍यावर तो शांत व्‍हायचा.

२. आरतीचा आवाज ऐकल्‍यावर अर्जुन लगेच दोन्‍ही हातांनी टाळ्‍या वाजवून प्रतिसाद द्यायचा.

१ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी असलेला भाव ! : अर्जुन दीड ते दोन वर्षांचा असतांना एकदा  देवघरातील गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ.आठवले यांचे) छायाचित्र घेऊन तो शयनगृहात गेला. त्‍याने ते छायाचित्र पलंगाला टेकवून ठेवले आणि छायाचित्राला साष्‍टांग नमस्‍कार केला. तो बोबडे बोलून त्‍यांना काहीतरी सांगत होता. तेव्‍हा ‘तो प.पू. गुरुदेवांशी (परात्‍पर गुरु डॉ.आठवले यांच्‍याशी) बोलत आहेे’, एवढेच आम्‍हाला कळले.

सुश्री (कु.) अश्‍विनी पैलवान

२. वय ४ ते ६ वर्षे

२ अ. देवावरील श्रद्धा ! : अर्जुन ५ वर्षांचा असतांना एकदा त्‍याची आई शाळेत गेली होती आणि मी सकाळी  चालायला म्‍हणून घराच्‍या बाहेर गेले होते. घरामध्‍ये अर्जुन एकटाच होता. त्‍याने दार लावल्‍यामुळे दाराला कुलूप लागून तो घरात अडकला. मी चालून घरी आल्‍यावर त्‍याला दार उघडता येईना आणि मलाही बाहेरून दार उघडता येईना. तेव्‍हा तो आतून जोरजोराने ‘देवा, मला वाचव. शिवा, मला वाचव’, असे मोठ्याने म्‍हणू लागला. तेव्‍हा त्‍याने आई-बाबा किंवा मला न बोलावता देवाला बोलावले. ते ऐकून शेजार्‍यांनाही त्‍याचे कौतुक वाटले.’

– सौ. लतिका पैलवान (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ६५ वर्षे, (अर्जुनची आजी (आईची आई)), फोंडा, गोवा.

२ आ. समंजस : ‘अर्जुन समंजस आहे. हट्टीपणा करत नाही.’ – सुश्री (कु.) अश्‍विनी पैलवान (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, (अर्जुनची मावशी), फोंडा, गोवा.

३. वय ७ ते ९ वर्षे

३ अ. नम्र : ‘अर्जुनच्‍या वागण्‍या-बोलण्‍यात नम्रता आहे. तो वडीलधार्‍या व्‍यक्‍तींशी, शिक्षकांशी आणि त्‍याच्‍या समवयस्‍क मित्रांशी नम्रतेने बोलतो. तो सर्वांशीच प्रेमाने वागतो.

३ आ. समंजस : एखादी गोष्‍ट ‘योग्‍य किंवा अयोग्‍य कशी आहे ?’, हे त्‍याला समजावून सांगितल्‍यावर तो लगेच ऐकतो आणि स्‍वीकारतोही.

३ इ. साधनेची ओढ : तिन्‍हीसांजेला देवासमोर दिवा लावल्‍यावर तो प्रतिदिन शुभंकरोती आणि गणपति अन् मारुति यांची स्‍तोत्रे म्‍हणतो. तो नियमितपणे कापूर आणि अत्तर यांचे उपाय करतो. तो अभ्‍यासाला बसण्‍यापूर्वी नियमितपणे गणपति, श्री सरस्‍वतीदेवी आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करतो.

३ ई. चूक लक्षात आणून देऊन साहाय्‍य करणे : प्रवचन घेतांना माझ्‍या बोलण्‍याची गती अधिक होऊ लागली, तर तो मला हातांनी खुणावून बोलण्‍याची गती न्‍यून करायला सांगतो.

३ उ. सूक्ष्मातून स्‍पंदने कळण्‍याची क्षमता 

१. कोरोनाच्‍या संसर्गामुळे दळणवळण बंदी असतांना मी ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्‍याची सेवा करत असे. तेव्‍हा अर्जुन माझ्‍या जवळच प्रवचन ऐकत बसायचा. प्रवचन चांगले झाल्‍यावर तो मला सांगायचा, ‘‘आई, आज प्रवचन चैतन्‍याच्‍या स्‍तरावर झाले.’’ जेव्‍हा प्रवचनात माझा भाव आणि भक्‍ती न्‍यून पडायची, तेव्‍हा तो मला म्‍हणायचा, ‘‘आई, आज प्रवचनात चैतन्‍य जाणवले नाही.’’

२. गुरुपौर्णिमेच्‍या प्रचारासाठी वैयक्‍तिक संपर्क करतांना तो मला ‘या घरी जाऊया किंवा या घरी जायला नको’, असे  सुचवायचा आणि प्रत्‍यक्षही त्‍याने सुचवलेल्‍या घरांतून चांगला प्रतिसाद मिळायचा.’

– सौ. रसिका सचिन गुळवे (अर्जुनची आई), पुणे

३ ऊ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धा ! : ‘अर्जुनची परात्‍पर गुरुदेवांवर (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर) दृढ श्रद्धा आहे. ‘गुरुदेवांची माझ्‍यावर कृपा आहे’, अशी त्‍याला सतत जाणीव असते. तो इयत्ता चौथीमध्‍ये (वय ९ वर्षे) असतांना शिष्‍यवृत्ती (स्‍कॉलरशिप) परीक्षेत तो गुणवत्ता यादीत सतरावा आला. सर्व नातेवाईक आणि परिचित त्‍याचे कौतुक करत होते. ते त्‍याच्‍या यशाचे श्रेय वेगवेगळ्‍या गोष्‍टींना देत होते. अर्जुनला याविषयी विचारल्‍यावर तो लगेच म्‍हणाला, ‘‘परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच मला हे यश मिळाले.’’ यातून त्‍याच्‍या मनात लहानपणापासूनच परात्‍पर गुरुदेवांप्रती असलेली श्रद्धा आणि भाव माझ्‍या लक्षात आला.’

– सुश्री (कु.) अश्‍विनी पैलवान (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, (अर्जुनची मावशी), फोंडा, गोवा.

४. वय १० वर्षे

४ अ. सतर्कता : ‘त्‍याच्‍यामध्‍ये बौद्धिक प्रगल्‍भता जाणवते. मी एकदा गणेशोत्‍सवात प्रवचनाच्‍या सेवेला जातांना त्‍याला माझ्‍या समवेत नेले होते. मी प्रवचन घेत असतांना तो माझ्‍या मागे बसून त्‍याचा शाळेचा अभ्‍यास करत होता. प्रवचनात मी गणपतीची एक गोष्‍ट सांगत असतांना मला एक शब्‍द अडला आणि तो आठवेना. तेव्‍हा अर्जुनने प्रसंगावधान राखून सतर्कतेने मला तो शब्‍द सुचवून लगेच ते वाक्‍य पूर्ण केले.

४ आ. तत्त्वनिष्‍ठता : वर्ष २०२२ च्‍या नवरात्रात आमच्‍या गृहसंकुलामध्‍ये ९ दिवस दांडिया चालू होता. एक दिवस त्‍याच्‍या बाबांनी त्‍याला ‘दांडिया खेळायला जा’, असे सांगितल्‍यावर त्‍याने स्‍पष्‍टपणे सांगितले, ‘‘मी जाणार नाही. मला आवडत नाही. आजच आमच्‍या शाळेत भोंडलाही (नवरात्रीच्‍या काळात कुमारीका करत असलेला एक उपचार) झाला आहे.’’

– सौ. रसिका सचिन गुळवे (अर्जुनची आई), पुणे

४ इ. आंतरिक साधना असणे

४ इ १. ‘अर्जुन इतर मुलांपेक्षा वेगळा आणि शांत आहे.

४ इ २. सेवेची आवड : अर्जुन अगदी मन लावून सेवा करतो. तो आंबेगाव पठार (पुणे) येथील श्रीराम मंदिरात   ‘गुढीपाडवा’ याविषयी फलक लेखन करतांना मला फार छान वाटत होते. ते लिखाण पाहूनच माझी भावजागृती होत होती. ‘त्‍यातून चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. अर्जुनकडे पाहून ‘त्‍याची आंतरिक साधना चालू आहे’, असे मला जाणवते.’

– सौ. अनुराधा तागडे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के), सातारा रस्‍ता, पुणे.

(सर्व सूत्रांचा दिनांक ५.१२.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक