सोलापूर, २३ जुलै (वार्ता.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुणे येथील ‘हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार येथील वनस्पतीशास्त्र पदवी प्राप्त डॉ. मनोज देवकर यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विद्यापीठ सभागृहात कुलगुरूंच्या उपस्थितीत २४ जुलै या दिवशी होणार आहे.
डॉ. मनोज देवकर हे वर्ष २००७ पासून आजपर्यंत वृक्ष संवर्धनासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. डॉ. देवकर यांनी वर्ष २०१४ ते २०२३ या कार्यकाळात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ या शिबिराच्या माध्यमातून गाव दत्तक घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. मागील १० वर्षे वृक्षसंवर्धन चळवळीमध्ये पर्यावरणाविषयी योगदान पाहून डॉ. देवकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.