प्रतिदिन छप्परपट्टी वसुलीला व्यापार्‍यांचा तीव्र विरोध !

जाचक करवाढ रहित करण्याची व्यापारी संघाच्या बैठकीत मागणी

राजापूर नगर परिषद

राजापूर – येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील खोकेधारक आणि हातगाडीधारक यांना करवाढीच्या पाठवलेल्या नोटिसांमुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात राजापूर व्यापारी संघाने बोलावलेल्या छप्परपट्टीधारकांच्या बैठकीत सर्वानुमते या करवाढीला प्रखर विरोध करण्यात आला असून ही करवाढ तात्काळ रहित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे .

७ जुलै या दिवशी राजापूर नगर परिषदेने शहरातील सुमारे ३५० छप्परपट्टीधारक आणि हातगाडीधारक यांना नोटिसा बजावल्या असून यापुढे ६ मास अथवा वर्षा ऐवजी दैनंदिन छप्परपट्टी वसूल करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. ही दैनंदिन छप्परपट्टी १ सप्टेंबर २०२३ पासून लागू करण्यात येणार असल्याचे या नोटिसीद्वारे कळवण्यात आले आहे. १५० चौरस फुटांपर्यंतच्या छप्पराला प्रतिदिन ३० रुपये, १५१ फुटांचेवरील छप्पराला प्रतिदिन ५० रुपये आणि १ मीटर x दीड मीटरच्या हातगाडीसाठी प्रतिदिन २० रुपये, त्यापेक्षा वाढीव हातगाडीसाठी प्रतिदिन ३० रुपये आणि हातगाडी अन् त्यावरील काढलेले विनापरवाना छप्पर यांसाठी प्रतिदिन ५० रुपये अशी आकारणी करण्यात येणार असल्याचे राजापूर नगर परिषद प्रशासनाने या नोटिसीद्वारे व्यापार्‍यांना कळवले आहे .

राजापूर नगर परिषद लागू करू पहात असलेली करवाढ व्यापार्‍यांसाठी अन्यायकारक

या अगोदर राजापूर नगर परिषदेकडून या छप्परधारकांना ६ मासांची अनुमती दिली जात होती आणि त्यासाठी १५० चौरस फुटांपर्यंत ६ मासाला ४०० रुपये आकारणी केली जात होती असे या छप्परपट्टीधारकांनी सांगितले; मात्र आता ज्याप्रकारे नगर परिषद छप्परपट्टी वसुली करू पहात आहे ती पूर्वीच्या तुलनेत १५ पट अधिक असून ही करवाढ व्यापार्‍यांसाठी अन्यायकारक आहे, असे मत व्यापारी संघाच्या बैठकीत मांडण्यात आले .

राजापूर नगर परिषद लागू करू पहात असलेली करपद्धती ही छोट्या व्यापार्‍यांवर वरवंटा फिरवणारी असून या करवाढीला राजापूर शहरातील सर्व व्यापारीवर्गाने विरोध केला आहे. ४ ऑगस्टपर्यंत हरकती देण्याच्या कालावधीमध्ये सर्वांनी स्वत:च्या हरकती देतांना पूर्वीप्रमाणेच करवसुली करण्यात यावी, असे नगर परिषदेला लेखी कळवण्याचे ठरवण्यात आले आहे . व्यापारी संघाने बोलावलेल्या या बैठकीसाठी शहरातील अनुमाने २५० छप्परपट्टीधारक व्यापारी उपस्थित होते. या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, खजिनदार दिनानाथ कोळवणकर, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र ठाकूरदेसाई , प्रकाश कातकर, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, नगरसेवक सुलतान ठाकूर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

जाचक छप्परपट्टीला आमचा विरोधच !- संदीप मालपेकर

याविषयी राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर म्हणाले की, व्यापार्‍यांना नोटिसा देवून भविष्यात वसूल केली जाणारी छप्परपट्टी जाचक असून सर्वसामान्य व्यापार्‍यांचे कंबरडे मोडणारी आहे. या करवसुलीला व्यापारी संघाचाही विरोध असून व्यापारी संघाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेवून हा विरोध दर्शवला आहे.