यज्ञयागांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
‘हिंदु संस्कृतीत यज्ञयागांना विशेष महत्त्व आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत (२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ पर्यंत) प्रतिदिन यज्ञयाग करण्यात आले.
‘यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर, तसेच त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ४ साधिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची चाचणी करण्यात आली. हे संशोधन ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे करण्यात आले. ते पुढे दिले आहे.
१. चाचणीतील प्रयोग
या चाचणीतील प्रयोगांत ४ साधिका आणि १ संत सहभागी झाले. यज्ञाला उपस्थित रहाण्यापूर्वी आणि यज्ञाला दीड घंटा उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे पुढीलप्रमाणे चाचण्या करण्यात आल्या.
१ अ. साधिका आणि संत यांच्या षट्चक्रांची स्थिती अभ्यासणे : यासाठी षट्चक्रांचे नमुने वापरून सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. षट्चक्रांचे नमुने वापरून व्यक्तीचे परीक्षण करतांना ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा उघडणे, म्हणजे तिच्या त्या त्या चक्राभोवती त्रासदायक स्पंदनांचे (काळ्या शक्तीचे) आवरण असणे. ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा न उघडणे, म्हणजे तिच्या त्या त्या चक्राभोवती त्रासदायक स्पंदनांचे आवरण नसणे.
१ आ. साधिका आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेची स्थिती अभ्यासणे : यासाठी ‘नकारात्मक’ अन् ‘सकारात्मक’ ऊर्जांचे नमुने वापरून सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या.
२. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन
२ अ. यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित साधिका आणि संत यांच्या षट्चक्रांवर सकारात्मक परिणाम होणे : यज्ञापूर्वी सर्वांच्या सहाही चक्रांवर अल्प-अधिक प्रमाणात त्रासदायक स्पंदनांचे आवरण होते. यज्ञानंतर साधिकांच्या चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ न्यून झाले आणि संतांच्या चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण नाहीसे झाले. यज्ञातील चैतन्याचा साधिका अन् संत यांच्या षट्चक्रांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पुढील निरीक्षणांतून दिसून आले.
२ आ. यज्ञानंतर साधिका आणि संत यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : यज्ञापूर्वी साधिका अन् संत यांच्यामध्ये सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा होत्या. यज्ञानंतर साधिकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली आणि संतांमधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
३. निष्कर्ष – यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर, सहस्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होणे
यज्ञाला उपस्थित असलेल्या साधिका आणि संत यांनी त्यांच्या क्षमतेनुसार यज्ञातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्या षट्चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ प्रमाणात अल्प किंवा नाहीसे झाले. चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून झाल्याने त्या त्या चक्रांचे कार्य सुधारते. साधिका अन् संत यांना यज्ञातील चैतन्य मिळाल्याने त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढली. यातून यज्ञाला उपस्थित रहाण्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.४.२०२३)
ई-मेल : [email protected]
|