संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सिद्ध ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

ग्रामस्थांची बैठक घेतांना जिल्हाधिकारी १. डॉ. राजा दयानिधी

सांगली – संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. पावसाचा वाढता जोर पहाता स्थानिकांनीही याविषयी तात्काळ माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. प्रशासन सर्व उपाययोजनांसाठी सिद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. शिराळा तालुक्यातील भूस्खलन सदृश्य परिस्थिती असणार्‍या मिरूखेवाडी आणि कोकणेवाडी गावातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या भागातील लोकांच्या स्थलांतराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दोन्ही गावांत पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पश्चिम भागातील वाड्यांवर रेंज नसल्यामुळे प्रशासनाचा या वाड्यांशी असणारा संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने संबंधित वाड्या-वस्त्यांवरील लोकांना ‘सॅटेलाईट फोन’चे प्रशिक्षण द्यावे. संबंधित वाड्यांवर सॅटेलाईट फोन ठेवण्यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना सूचित केले.’’ या वेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, उपवनसंरक्षक नीता कट्टे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उमेश पोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांसह अन्य उपस्थित होते.

ग्रामस्थांमधील एक होऊन जिल्हाधिकारी बैठकीत सहभागी ! 

ग्रामस्थांची बैठक घेतांना कोणताही बडेजाव न बाळगता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे भारतीय बैठक घालून ग्रामस्थांसमवेत बसले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना सांगितल्या.