यवतमाळ येथे पुरातील ४५ जणांना वाचवण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानामुळे परतले !

पूरस्थितीमध्ये मदतकार्य करण्यासाठी आलेले हेलीकॉप्टर

यवतमाळ – महागाव तालुक्यातील अनंतवाडी तांडा येथे पुरामध्ये अडकलेल्या ४५ नागरिकांच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद (एस्.डी.आर्.एफ्.) पथक कार्य करत आहे. नागपूर येथून २ हेलिकॉप्टर मागवण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळाची पहाणी केली; परंतु प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर त्यांना न वाचवता परतले. येथे अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरलेले आहे. ३५७ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. २५ गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

बुलढाण्यातील काथर गावात पांडव नदीला पूर आल्यामुळे १५० नागरिक त्यात अडकले होते; मात्र त्यांना वाचवण्यात आलेले आहे.

नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने नांदेड-विदर्भ संपर्क तुटला !

नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीच्या पुलावरून पाणी वहात असल्याने नांदेड आणि विदर्भ यांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने ८० नागरिकांना उर्दू शाळेत स्थलांतरीत केले आहे. अतीपावसाने भूमी खरडून गेल्या आहेत. खरिपाची मोठी हानी झाली आहे. ‘पाऊस ओसरताच कृषी आणि महसूल प्रशासनाकडून हानीचे पंचनामे करण्यात येणार आहे’, अशी माहिती तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली.

माहूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने माहूर, किनवट आणि सहस्रकुंड धबधबा अन् इतर पर्यटन क्षेत्रांत जनतेने पुढील ४ दिवस जाऊ नये, अशी चेतावणी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. धानोडा ते किनवटकडे जाणार्‍या पुलावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माहूरजवळील टाकळी गावात पुरात अडकलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पथके रवाना केली आहेत.