मणीपूरमधील मैतेई हिंदूंवर आतापर्यंत झालेला अन्याय आणि अत्याचार निधर्मी माध्यमे समोर केव्हा आणणार ?
मणीपूरमध्ये २ महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले. कुठल्याही सुसंस्कृत समाजात असे घडणे, हे लाजिरवाणे आहे. भारतीय संस्कृतीत आणि समाजात महिलांना देवीचा दर्जा दिला आहे. अशी उदात्त विचारसरणी असलेल्या देशात असे प्रकार घडणे, हे निंदनीय आहे. त्यामुळे याविषयी वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांनी स्वतः व्यक्त होणे स्वाभाविक होते. मुळात २ मासांपूर्वी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला नसता, तर आरोपी समाजात मोकाट फिरले असते. पोलिसांनी या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. हे संतापजनक होय. भारतात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडतात. महिलांवरील बलात्कार, लैंगिक शोषण अशा बर्याच प्रकरणांत पोलीस पीडित महिलांची तक्रार नोंदवून घेत नाहीत, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतात, काही प्रकरणात तर महिलांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत त्यांच्यावर बलात्कार करतात, असेही प्रकार घडले आहेत. पोलिसांनी २ मासांपूर्वीच योग्य ती पावले उचलली असती, तर सर्व आरोपी गजाआड झाले असते. मागील कित्येक मास मणीपूर धुमसत आहे. तेथील हिंसाचार आटोक्यात आणण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना आता उघडकीस आल्यानंतर मणीपूरमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यामुळे पुढील काही मास मणीपूर हिंसाचारात होरपळल्यास आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात लोक पोलीस, अन्य यंत्रणा सर्वांना दोष देत आहेत. कुठलीही समाजविघातक घटना घडल्यावर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते; मात्र पुढे जाऊन त्यावर कुठलीच कृती होत नाही. या प्रकरणात तरी यंत्रणा सक्षम आणि प्रामुख्याने समाजाभिमुख करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा समाजातील घोडचुकांमधून आपण काही शिकत नाही आणि ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशी स्थिती निर्माण होईल. या घटनेनंतर ‘भारतीय पोलीसदलाचे काय करायचे ?’, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसदलामध्ये सर्वंकष पालट करणे आवश्यक आहे, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
स्त्रियांवरील अत्याचार हा संवेदनशील विषय ! मणीपूरच्या घटनेनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही पुढे सरसावल्या आहेत. या अभिनेत्रींनी दाखवलेली सजगता योग्यच म्हणावी लागेल; कारण समाजविघातक घटनेचा तत्परतेने निषेध करणे, हे जागृत नागरिकाचे लक्षण आहे. असे असले, तरी ‘या अभिनेत्री लव्ह जिहादच्या घटना किंवा अन्य वेळी महिलांवर होणारे अत्याचार यांविषयी काहीच का बोलत नाहीत ?’, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो. या अभिनेत्री वा कलाकार यांचा चाहता वर्ग फार मोठा असल्याने ते समाजात चांगला पालट घडवण्यास साहाय्य करू शकतात; मात्र ठराविक घटनांच्या वेळी मते प्रदर्शित करणे आणि अन्य महिलांवर अत्याचार होत असतांना मात्र काहीही न बोलणे यातून त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. असो.
‘मनुस्मृति’वर टीका का ?
या प्रकरणात आणखी एक संतापजनक घटना म्हणजे या प्रकरणात पुन्हा एकदा हिंदु धर्म आणि ‘मनुस्मृति’सारखे हिंदूंचे धार्मिक ग्रंथ यांना अपकीर्त करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून ‘बाईची नग्न धिंड काढल्यावर समाज शांत; मात्र गायीची धिंड काढली असती, तर समाज पेटला असता’, असे म्हटले आहे. वास्तविक मणीपूर येथील प्रकरणाची गायींशी तुलना करण्याचे कारणच काय ? या नेत्याचा रोख हिंदूंकडे आहे, हे सांगायला नको. गोरक्षण हा वेगळा आणि महिलांवरील अत्याचार हा वेगळा विषय झाला. दोन्ही विषय संवेदनशील आणि सामाजिक आहेत. गोरक्षणाला सामाजिकसह धार्मिक अंगही आहे. त्यामुळे अशांची तुलना करून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्याची ही वृत्ती निंदनीय आहे. पुढे जाऊन आव्हाड यांनी ‘मनुस्मृति’ हा हॅशटॅगही दिला आहे. मणीपूर येथील अत्याचाराचा मनुस्मृतीशी काय संबंध ? ‘मनुस्मृति स्त्रीद्वेषी आहे’, असे पुरो(अधो)गाम्यांकडून रंगवले जाते. अशांवरही कारवाई करण्याची मागणी आता हिंदूंनी करायला हवी. ‘श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करणार्या आफताब पुनावाला याने कोणते पुस्तक वाचले होते ?’, हा प्रश्न विचारण्याचे धाडस पुरो(अधो)गाम्यांचे होते का ? हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’चा उच्चार केल्यावर त्यांना धर्मांध ठरवले जाते. मग मणीपूरसारख्या प्रकरणांना धार्मिक रंग देणार्यांना काय म्हणायचे ? मणीपूर प्रकरणाला धार्मिक रंग देऊन कुणी हिंदूंना आणि त्यांच्या धर्मग्रंथांना लक्ष्य करत असेल, तर हिंदूंनीही त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी पुढे येणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य होय !