लोकसभेच्‍या निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्‍ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्‍ती पीठाधीश्‍वर श्री शक्‍तीजी महाराज, श्री महाकालीमाता शक्‍तीपीठ प्रतिष्‍ठान, अमरावती

श्री १००८ महाशक्‍ती पीठाधीश्‍वर श्री शक्‍तीजी महाराज

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, फोंडा) – सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्‍याचा निर्णय तत्‍परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्‍ट्रमाता’ घोषित करण्‍याचा निर्णय तत्‍परतेने का होऊ शकत नाही ? राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमची विनंती आहे की, लोकसभेच्‍या निवडणुकीपूर्वी गोमातेला राष्‍ट्रमाता घोषित करावे अन्‍यथा आम्‍ही रस्‍त्‍यावर येऊन आंदोलन करू. जन्‍मदात्‍या आईनंतर गाय आपली माता आहे. तिचे रक्षण करण्‍यात आपण न्‍यून पडत आहोत. नांदेड येथे गोरक्षकांच्‍या हत्‍या करण्‍यात आल्‍या. गोरक्षकांना प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. गोमातेचे रक्षण करण्‍यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवे, असे वक्‍तव्‍य अमरावती येथील श्री महाकालीमाता शक्‍तीपीठ प्रतिष्‍ठानचे श्री १००८ महाशक्‍ती पीठाधीश्‍वर श्री शक्‍तीजी महाराज यांनी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात केले. हा वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे पार पडला.


हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्‍थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांना सादर नमन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्‍या, धर्मांतर आदी आघातांच्‍या विरोधात कार्य करणारे अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना देशभर कार्यरत आहेत. अशा संघटनांना एका व्‍यासपिठावर आणून त्‍यांना विविध दिशा देण्‍याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. अशी समिती आणि तिचे प्रेरणास्‍थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांना सादर नमन आहे !

– मुन्‍ना कुमार शर्मा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, नवी देहली.


निवडणुकीमध्‍ये लव्‍ह जिहाद, गोहत्‍याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना निवडून देणे आवश्‍यक ! – मुन्‍ना कुमार शर्मा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, नवी देहली

श्री. मुन्‍ना कुमार शर्मा

जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्‍य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्‍पसंख्‍य झाल्‍यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहुसंख्‍य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे लागत आहे. त्‍यामुळे हिंदू सुरक्षित राहिले, तर भारतासह विश्‍वही सुरक्षित राहील. येत्‍या निवडणुकीमध्‍ये  लव्‍ह जिहाद, गोहत्‍याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्‍यांची जातपात न पहाता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्‍ट्र येईल, तेव्‍हा आपले राष्‍ट्र जगभरात बलवान होईल. त्‍यामुळे आपल्‍याला सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या साहाय्‍याने भारताला हिंदु राष्‍ट्र करण्‍यासह संपूर्ण विश्‍वाला हिंदुमय करायचे आहे.


पुढील अधिवेशनापूर्वी १ सहस्र गावांमध्‍ये हनुमान चालिसाचे पठण चालू करणार ! – कमलेश कटारिया, अध्‍यक्ष, संकल्‍प हिंदु राष्‍ट्र अभियान, संभाजीनगर

श्री. कमलेश कटारिया

हिंदूंची धर्माविषयीची आस्‍था न्‍यून झालेली नाही. श्रद्धावान हिंदू त्‍यांच्‍या वेळेनुसार मंदिरात जातात. या सर्व हिंदूंना हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सहभागी करून घेण्‍यासाठी आम्‍ही ‘हनुमान चालिसाचे पठण’ हा समान कृती कार्यक्रम निश्‍चित केला आहे. १४ गावांमध्‍ये आम्‍ही हनुमान चालिसाचे पठण चालू केले आहे. यासाठी ४ सहस्रांहून अधिक हिंदू एकत्र येतात. पुढील वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला येण्‍यापूर्वी १ सहस्र गावांमध्‍ये हनुमान चालिसा चालू करण्‍याचा आम्‍ही संकल्‍प केला आहे. भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍यात यावे, यासाठी प्रत्‍येक मासाला आम्‍ही ‘हिंदु कर्तव्‍यदिन’ साजरा करतो. यामध्‍ये प्रत्‍येक मासाच्‍या ४ आणि ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ‘भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करावे’, अशी मागणी केली जाते. अशा प्रकारे पत्रांची संख्‍या उत्तरोत्तर वाढत आहे. हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ हा एकमेव उपाय आहे. ‘जागरूक आणि संघटित हिंदूच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करू शकतील.


सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्‍यक ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

नवीन संघटनेची स्‍थापना केली जाते, तेव्‍हा त्‍यांनी ध्‍येयही ठरवणे आवश्‍यक आहे. ध्‍येय ठरवल्‍यानेच संघटनेच्‍या कार्याला दिशा आणि गती मिळते. त्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रत्‍येक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने ध्‍येय ठरवून कार्य करणे आवश्‍यक आहे. देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर पंडित आणि महात्‍मा यांनी सर्वधर्मसमभावाचे कथानक (नॅरेटिव्‍ह) भारतियांवर थोपवले. त्‍याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले. सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. भारताकडे असलेल्‍या ज्ञानपरंपरेकडे पाहून संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होत आहे. हिंदूंचे शास्‍त्र आणि विज्ञान परिपूर्ण आहे. त्‍यामुळे हिंदु धर्मसिद्धांत केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत.


हिंदु राष्‍ट्राच्‍या या धर्मयुद्धात कितीही अडचणी आल्‍या, तरी आम्‍ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

पू. रमानंद गौडा

सर्व धर्माभिमानी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे  धर्मयुद्ध लढत आहेत. त्‍यामुळे या कार्यामध्‍ये स्‍थूल आणि सूक्ष्म स्‍तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्‍या कृपेने या अडचणींवर मात करून आम्‍ही सतत पुढे जाण्‍याचा प्रयत्न करतच रहाणार आहोत. हे धर्मयुद्ध लढत असतांना विविध अडचणी येतात. त्‍यावर मात करण्‍यासाठी साधना केली पाहिजे. त्‍यामुळे आपल्‍याला आध्‍यात्मिक बळ मिळते, तसेच आपल्‍या कार्यामागे भगवंताचे अधिष्‍ठान प्राप्‍त होते. त्‍यामुळे आपण आपले कार्य अधिक चांगले करू शकतो आणि नेहमी पुढे जात रहातो. साधनेने आपल्‍या भोवती सूक्ष्म संरक्षण कवच निर्माण होते. त्‍यामुळे अनिष्‍ट शक्‍तींपासून आपले रक्षण होते.


प्रत्‍येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्‍यास गोशाळांची आवश्‍यकता भासणार नाही ! – अधिवक्‍ता आलोक तिवारी, उपाध्‍यक्ष, जांबाज हिंदुस्‍थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश.

अधिवक्‍ता आलोक तिवारी

सरकार गोहत्‍या रोखण्‍यासाठी काहीही करत नाही, असे अनेकांना वाटते. गायीने दूध देणे बंद केल्‍यावर आपले हिंदू तिला विकून टाकतात. प्रत्‍येक हिंदु कुटुंबाने स्‍वत: २ गायी पाळल्‍या, तर भारतात गोशाळांची आवश्‍यकता भासणार नाही.