पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्‍या बाहेर !

पंचगंगा नदी

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर जिल्‍ह्यात चालू असलेल्‍या संततधार पावसाने कोल्‍हापूर शहरात १९ जुलैला पंचगंगा नदी रात्री ११.१५ वाजता नदीच्‍या पात्राच्‍या बाहेर पडली. सध्‍या नदीच्‍या पाण्‍याची पातळी ३२ फूट असून केवळ एका दिवसात १० फूट पाणी वाढले आहे. चंदगड तालुक्‍यातील जांबरे प्रकल्‍प पूर्णपणे भरला असून जिल्‍ह्यातील १५ पैकी ३ प्रकल्‍प पूर्णपणे भरले आहेत. राधानगरी धरणात ६२.६१ टक्‍के पाणीसाठा आहे. जिल्‍ह्यातील विविध मार्गांपैकी ३ जिल्‍हा आणि २ राज्‍य मार्गांवर नदीचे पाणी आल्‍याने मार्गावरील वाहतूक बंद करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील ५१ बंधारे पाण्‍याखाली गेले आहेत.


रांगणागड, नाईकवाडी, सवतकडा, तोरस्‍करवाडी धबधबे पर्यटनासाठी बंद !

रांगणा गड
रांगणा गड बंद करण्‍यात आल्‍याचा फलक

 

जिल्‍ह्यातील भुदरगड तालुक्‍यात जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत होणार्‍या पावसामुळे रांगणागड, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा, दोनवडे येथील सवतकडा धबधबा, तसेच भुदरगड तालुक्‍यालगत असणार्‍या तोरस्‍करवाडी धबधब्‍याच्‍या ठिकाणी जाण्‍यासाठी पर्यटक आणि स्‍थानिक यांना बंदी करण्‍यात आली असल्‍याची माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिकारी तथा तहसीलदार अश्‍विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे.


साहाय्‍य आणि बचाव कार्यासाठी एन्.डी.आर्.एफ्.चे पथक सांगलीत !

सांगली – सांगली जिल्‍ह्यात पावसाळ्‍यात अतीवृष्‍टीमुळे होणारी संभाव्‍य हानी टाळण्‍यासाठी, तसेच साहाय्‍य आणि बचाव कार्यासाठी एन्.डी.आर्.एफ्.चे पथक सांगलीत आले आहे. या पथकात राजेश येवले आणि मोहित शर्मा असे दोन अधिकारी आणि इतर २० जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरी, इमारत कोसळल्‍यानंतर शोध आणि सुटका कामी आवश्‍यक साहित्‍य सामग्री उपलब्‍ध आहे. हे पथक ३१ ऑगस्‍टअखेर सांगली जिल्‍ह्यात कार्यरत रहाणार आहे.


कोयना धरणातील पाण्‍याच्‍या साठ्यात वाढ !

सातारा – जिल्‍ह्यातील कोयना धरणातील पाण्‍याच्‍या साठ्यात ६ टी.एम्.सी.ने वाढ होऊन तो आता ३७.३७ टी.एम्.सी. झाला आहे. सांगलीत कृष्‍णा नदीच्‍या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून ती सध्‍या १५ फूट इतकी नोंदवली गेली. अलमट्टी धरणात ३१.३९ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे.