मुंबई, २० जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र शासकीय पशू आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापिठाच्या कार्यकारिणीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून गोसेवा आयोगाच्या एका प्रतिनिधीची निवड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. २० जुलै या दिवशी महाराष्ट्र पशू आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्ये सुधारणा करून शासनाने ही नियुक्ती घोषित केली. पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सुधारणा विधानसभेत वाचून दाखवली.
यासह विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्देशित केलेले ३, तर विधान परिषदेच्या सभापतींनी निर्देशित केलेले ३ सदस्य यांचीही नियुक्ती शासकीय पशू आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापिठाच्या कार्यकारिणीमध्ये करण्याची सुधारणा शासनाकडून या विधेयकामध्ये करण्यात आली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.