‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेचे प्रकरण

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, २० जुलै (वार्ता.) – नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीला अहवाल सादर करण्यासाठी १ मासाचा कालावधी देण्यात आला होता. चौकशीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करून २० जुलै या दिवशी विरोधकांनी चौकशीच्या मुदतवाढीवर आक्षेप घेतला. सत्ताधारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

या तारांकित प्रश्नाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी ‘चौकशी आयोगाला ३ मास झाले आहेत. आणखी मुदतवाढ कशाला ? मुदतवाढ करून हे प्रकरण गुंडाळू इच्छित आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला. बाळासाहेब थोरात यांनी ‘कार्यक्रम भर उन्हात कुणाच्या सोयीसाठी घेण्यात आला ?’ असा प्रश्न उपस्थित केला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, ‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’